जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप परवान्यांसाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:07+5:302021-09-15T04:45:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ठराविक कारखाने वगळले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ठराविक कारखाने वगळले तर बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या उसाची एफआरपी रक्कम अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही. दि. १५ ऑक्टोबरपूर्वी एफआरपीची रक्कम पूर्ण करून गाळप परवाना मिळविण्यासाठी जिल्ह्यातील कारखानदारांची धावाधाव सुरू आहे.
जे कारखाने १५ ऑक्टोबरपूर्वी एफआरपी न देता उसाचे गाळप सुरू करतील, त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच एफआरपी थकविलेल्या कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. दि. १५ ऑक्टोबरपूर्वी ही रक्कम देण्यासाठी कारखानदारांची धावाधाव सुरू आहे.
साखर लेखा विभागात उपलब्ध असलेल्या ३० सप्टेंबरच्या अहवालानुसार मोजक्या कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम व अधिकचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. त्यामध्ये खटाव, माण कारखाना, रयत कुमुदा, न्यू फलटण शुगर अशा ठराविक कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली आहे.
किसनवीर कारखान्याने अजूनही ५० टक्के रक्कम दिलेली नाही. अजिंक्यतारा कारखान्याने पहिला हप्ता २ हजार ६०० रुपये, तर दुसरा हप्ता २०० रुपये दिले. २४३ रुपये देणे बाकी असून, कारखान्याची एकूण एफआरपी तीन हजार ४३ इतकी आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने ३ हजार ८ रुपये इतकी एफआरपी जाहीर केली. पहिला हप्ता २ हजार ६०० रुपये, दुसरा हप्ता २०० रुपये व येणे बाकी २०८ रुपये आहे. जरंडेश्वर कारखान्याचा दर २ हजार ९२५ रुपये इतकी आहे. त्यापैकी २ हजार ६०० रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. उर्वरित रक्कम काढण्याचे काम सुरू आहे. वर्धन ॲग्रोने २ हजार ५०० रुपये जाहीर केले. त्यापैकी काही शेतकऱ्यांना २ हजार ४०० व काहींना २ हजार ६०० रुपये दिले. सह्याद्री कारखान्याने २ हजार ९०० पैकी २ हजार ७५० रुपये रक्कम दिलेली आहे.
रयत कुमुदा आघाडीवर
शेतकऱ्यांना एफआरपी कायद्यानुसार ऊस दर देण्यामध्ये जिल्ह्यातील खासगी कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र आहे. कऱ्हाड तालुक्यातील रयत कारखाना हा रयत कुमुदा या नावाने भाडेतत्त्वावर खासगी व्यक्तींमार्फत चालवला जातो. या कारखान्याने २ हजार ९०० रुपये इतकी एकरकमी एफआरपी व ३० रुपये प्रतिटनामागे ज्यादा रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.
खंडाळा कारखान्याचीही एफआरपी पूर्ण
किसनवीर साखर कारखान्यातर्फे भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा सहकारी साखर कारखाना व प्रतापगड सहकारी साखर कारखाने चालविले जातात. विशेष म्हणजे इतर कारखान्यांची एफआरपी थकली असली तरी खंडाळा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. त्यामुळे या कारखान्याला गाळप परवाना मिळण्यात अडचण राहिलेली नाही.