डोक्यात दगड पडल्याने पर्यटक महिलेचा मृत्यू; पळशीत तरुण वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 09:41 PM2019-10-30T21:41:26+5:302019-10-30T21:44:48+5:30
शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोनाली गायकवाड यांचा मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने बुधवारी रात्री आठच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम पाठवून दिल्यानंतर शोध घेतला. मात्र अंधारामुळे त्यांनाही अडचणी आल्या
महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील धबधब्यावर फोटो काढण्यासाठी उभ्या असलेल्या भोर येथील एका पर्यटक महिलेचा डोक्यात दगड पडल्याने मृत्यू झाला. सोनाली प्रशांत गायकवाड (वय २८) असे तिचे नाव असून, ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिवाळी सुटी असल्याने भाऊबीजदिवशी महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेले होते. मंगळवारी सकाळी भोर (पुणे) येथून सोनाली गायकवाड या पती प्रशांत, सासू व पाच वर्षांच्या मुलीसोबत महाबळेश्वरला पर्यटनासाठी आल्या होत्या.
दुपारी सर्वजण आंबेनळी धबधबा पाहण्यासाठी गेले. यावेळी सोनाली गायकवाड धबधब्याखाली फोटो काढण्यासाठी उभ्या होत्या. त्यांचे पती फोटो काढत असताना अचानक एक दगड सोनाली यांच्या डोक्यावर येऊन आदळला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. पती प्रशांत यांनी त्यांना तातडीने वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना सोनाली गायकवाड यांचा मृत्यू झाला.
- सूचना फलकाचा अभाव
महाबळेश्वर-प्रतापगड मुख्य राज्यमार्गावर मेटतळे गावानजीक उंचावरून कोसळणारा आंबेनळी धबधबा आहे. पर्यटक येथे जीवाची पर्वा न करता दगडांखालीच भिजण्याचा आनंद लुटताना सर्रास पाहावयास मिळतात. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी सूचना फलक लावणे गरजेचे आहे.
तीस तासांचे शोधकार्य अयशस्वी : आपत्ती व्यवस्थापन ठरतंय कूचकामी; तालुक्यात सहा बळी
पळशी : माण तालुक्यातील पळशी येथील माणगंगा नदीवरील पाटील वस्तीजवळील बंधाºयात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोहायला गेलेल्या तुकाराम यादव खाडे (वय २५) या तरुणाचा बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. तर दोन तरुणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
पळशी येथील माणगंगा नदीवरील जाशी रस्त्यानजीक पाटील वस्तीजवळील बंधाºयावर तुकाराम खाडे, निवास साबळे, भीमराव नाकाडे व संपत खाडे हे पोहायला गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी तुकाराम खाडे, निवास साबळे व भीमराव नाकाडे हे बंधाºयाच्या भिंतीवरून खाली फेकले गेले. तिथे मोठ्या प्रमाणात पाणी फिरत असल्याने भोवºयात ते फसले गेले. निवास व भीमराव हे बंधाºयांच्या भिंतीचा आधार घेऊन उभे राहिले तर तुकाराम मोठ्या प्रवाहात फसल्याने पाण्यात दिसेनासा झाला. तद्नंतर संपत याने आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे लोक जमा झाले. दोर लावून त्या दोघांना वर काढण्यात यश आले. तर तुकारामला मोठ्या प्रमाणात पाणी फिरत असल्याने मदत करता आली नाही. तसेच तो बुडाल्यानंतर दिसलाच नाही. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी शोध घेतला; मात्र शोध लागलाच नाही. तहसीलदार बाई माने यांना फोन केल्यानंतर त्यांनी कºहाडवरून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बोटीची व्यवस्था केली. कºहाडची बोट बुधवारी सकाळी अकरा वाजता आल्यानंतर त्यांनी शोधमोहीम राबवली; मात्र तिथे तीस फुटापर्यंत पाण्याची खोली असल्याने मदत करता आली नाही.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने बुधवारी रात्री आठच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम पाठवून दिल्यानंतर शोध घेतला. मात्र अंधारामुळे त्यांनाही अडचणी आल्या व रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. तुकाराम खाडे याच्या पश्चात वडील यादव खाडे, आई आशा, पत्नी तेजल व दोन वर्षांची व सहा महिन्यांची अशा दोन मुली आहेत.
सुस्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन !
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घटना घडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत तपास लागू शकला नाही. आपत्ती व्यवस्थापनने एनडीआरएफसारखी टीम बोलवणे गरजेचे होते. पाण्याची खोली जास्त असल्याने पाण्यातून बुडी देऊन शोध घेणे आवश्यक असताना तसे झाले नाही.