धावपट्टी अन् चांगल्या चपलांचाही नाही पत्ता ...डोंगरदऱ्यातून धावताहेत चिमुरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:13 AM2019-03-17T00:13:56+5:302019-03-17T00:15:22+5:30
सागर चव्हाण । पेट्री : जावळी तालुक्यातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील एकीव प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून बाराही महिने ...
सागर चव्हाण ।
पेट्री : जावळी तालुक्यातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील एकीव प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून बाराही महिने रस्त्यावरून सुसाट धावण्याचा सराव करत आहेत. शासकीय क्रीडा स्पर्धा, यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा, जावळी मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्राविण्य मिळविले आहे. विशेष म्हणजे, या मुलींसाठी धावपट्टी नाही की चांगल्या चपला; इच्छाशक्ती हेच बलस्थान आहेत.
कास पठाराच्या कुशीत वसलेले एकीव हे एक छोटंसं गाव. येथे बहुतांशी प्रमाणात शेती हा व्यवसाय तसेच पशुपालन जोडधंदा म्हणून केला जातो. गावातील प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी ज्ञानग्रहण करतात. विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात दबदबा झाला आहे. अॅथलेटिक्स या प्रकारात ओळख निर्माण केली आहे.
ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता बाराही महिने अगदी उन्हाळी, दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या अनुपस्थितीतही उत्कृष्ट पळण्याचे धडे गिरवतात. प्राप्त परिस्थितीत रस्त्यावरून धावण्याचा करत असलेला सराव संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जन्मजातच विद्यार्थ्यांमध्ये असलेला काटकपणा ओळखून राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट प्राविण्य मिळविण्यासाठी शाळेतील क्रीडाशिक्षक व त्यांचे सहकारी पळण्यासाठी तांत्रिक बाबीकडे लक्ष देतात. त्यांचा आहार व सरावाचे नियोजन करून देत आहेत. तसेच सकाळ-संध्याकाळ दोनशे मीटर, शंभर मीटर, पन्नास मीटर, वीस मीटर, दहा मीटर अशा प्रकारे धावण्याचा सराव नियमित घेतला जातो.
अनेक मॅरेथॉन स्पर्धेत यश...
प्रिया कदम हिने सलग तीन वर्षे यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा तालुकास्तरीय दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर देखील प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच दोन-तीन वर्षांपासून अश्विनी गोरे या विद्यार्थिनीनेही ४०० मीटर धावण्यात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. जावळी मॅरेथॉनसारख्या मॅरेथॉन स्पर्धेत यश संपादन केले. जिद्द, चिकाटी पाहून पुणे येथील संस्थेकडून त्यांना शूज व कीट दिले आहे.
आमच्यातील सुप्त गुणांना वाव देत योग्य मार्गदर्शन गुरुवर्याकडून मिळते. अचूक सराव घेत असल्यानेच आमच्यात स्पर्धेबद्दल आवड निर्माण झाली. मी तीनवेळा जिल्हास्तरावर उत्तम प्राविण्य मिळविले आहे. यापुढे क्रीडा प्रबोधिनीत निवड होण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली माझा सराव सुरू आहे. - प्रिया कदम, विद्यार्थिनी
अनेक विद्यार्थ्यांची क्रीडा प्रबोधिनीत निवड होण्यात यश आले आहे. विद्यार्थ्यांची क्षमता पाहून अचूक तांत्रिक सराव, पूर्व व्यायाम, दोरीवरच्या उड्या, आहार आदी बाबींकडे वर्षभर लक्ष दिले जाते. शाळेतील एक तरी खेळाडू राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, अशी इच्छा आहे.
- प्रकाश धनावडे, मुख्याध्यापक,