ग्रामीण भागात कंदिलाच्या जागी आता सौर दिवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:23+5:302021-06-24T04:26:23+5:30
कुडाळ : आज सगळीकडेच विजेचा झगमगाट पाहायला मिळत आहे. बदलत्या काळानुसार प्रकाशाची साधनेही बदलत गेली आहेत. एकेकाळी ज्या दिवा, ...
कुडाळ : आज सगळीकडेच विजेचा झगमगाट पाहायला मिळत आहे. बदलत्या काळानुसार प्रकाशाची साधनेही बदलत गेली आहेत. एकेकाळी ज्या दिवा, पणतीचा उजेडासाठी आधार असायचा तीही आता देवघरातच; पण पूर्वी वीज गेल्यावर घरात प्रकाश पडायचा तो कंदील, चिमण्यांमुळे. एकेकाळी अंधारात वाट दाखविणारा हा कंदील आज मात्र घरातील अडगळीच्या कोपऱ्यात गुडूप झाला आहे.
आजच्या आधुनिक युगात पारंपरिक दिवे जाऊन विद्युत दिव्यांचा वापर होऊ लागला. तरीही आज ग्रामीण भागात आपल्याला अशा प्रकारचे कंदील, गॅसबत्तीचा वापर झालेला पाहायला मिळत आहे. कंदिलासाठी रॉकेलचा वापर व्हायचा, आजही केला जातो; पण आता रॉकेलही मिळत नाही. याला उत्तम पर्याय म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे कंदिलासारखे दिसणारे दिवे आज बाजारात मिळत आहेत. इंधनाची याला गरज नाही. निसर्गातून फुकट मिळणाऱ्या ऊर्जेवरच याचा लखलखाट होतो. सौर ऊर्जेवरील या आधुनिक साधनांचा पर्याय स्वस्त असल्याने पारंपरिक कंदिलाची जागा आता या सौर दिव्यांनी घेतली आहे.
पूर्वीच्या काळात वाहतुकीसाठी बैलगाडीच्या सोबतीला गाडीवानाला अंधारातून वाट दाखविण्यासाठी कंदिलाचीच सोबत असायची. आधुनिकतेत आता याची जागा भिंतीवरील शोपीस म्हणूनच झालेली आहे. ग्रामीण भागातील एकेकाळी प्रकाशाचा आधार आता अडगळीत पडून आहे. भविष्यात कंदील नाव घेतल्यावर नवीन पिढीला मात्र तो चित्ररूपातच पाहायला लागणार आहे.
(चौकट)
पारंपरिक वस्तूची आकर्षक मांडणी..
आज जरी आपण लख्ख प्रकाशात वावरत असलो तरीही या शांतपणे जळणाऱ्या पणती किंवा कंदिलाची शोभा काही न्यारीच होती. धगधगत्या जगापासून शांत, एकांतात या मंद प्रकाशात जगण्याचा आनंद शोधणारी मंडळीही आहेत. आज अनेक घरात हॉटेल्समध्ये आपल्याला या पारंपरिक वस्तूची आकर्षक अशी मांडणी करून शोपीस म्हणून ठेवलेला पाहायला मिळत आहे. आपली कल्पकबुद्धी आणि कौशल्याचा वापर वेगळ्या पद्धतीने केला तर निश्चितच आपली पूर्वापर संस्कृती-परंपरा आपण जपू शकतो.
२३कुडाळ सौर दिवा
फोटो: एकेकाळी गाडीवानाला उजेडात रस्ता दाखविणारा कंदील आज घरच्या अडगळीच्या खोलीत भिंतीवर खुंटीला टांगलेला दिसत आहे.