ग्रामीण भागात अद्याप चलन कल्लोळ सुरूच !
By admin | Published: January 5, 2017 11:57 PM2017-01-05T23:57:27+5:302017-01-05T23:57:27+5:30
पै-पै ला महाग : सामान्यांचं जिणं झालं मुश्कील
विठ्ठल नलवडे ल्ल कातरखटाव
नोटा चलनातून रद्द होऊन दीड महिना झाला तरी सामान्य माणसांची आर्थिक परवड अजून काही संपेनाशी झालं आहे. नोटाबंदीमुळं ग्रामीण भागात चलन कल्लोळ माजला आहे. जिल्हा बँकेतील खात्यात स्वत:चे पैसे असूनही शेतकरी, सामान्य माणूस पै-पै ला महाग झाला आहे.
नोटाबंदीचं सर्वच स्तरावर स्वागत झालं असलं तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील दळणवळण बिघडल्यामुळे जनसामान्याची परवड नाकीनऊ झाली आहे. कुणाला दवाखान्यांची अडचण तर कुणाच्या ‘शुभमंगल सावधान’चा कार्यक्रम, निराधाराला ६०० रुपयांचा आधार, तो म्हणतोय माझी पेंशन जमा झाली का? कोण म्हणतोय, साहेब पैसे आले का? आठ दिवस झाले हेलपाटे मारतोय दोन हजार तरी द्या. या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेत सध्या खातेदार पै-पै ला महाग झाले आहेत.
अनेक दिवस शेतकरी, खातेदार, निराधार, पेंशनधारक, हेलपाटे मारत आहेत; पण पैसे काय मिळत नाहीत. साहेब म्हणतात, ‘बसा. थांबा. कुणाचा भरणा आला तर बघू, कुणाचा भरणा काही येत नाही. बँकेला कुणी भरणाधारक काही भेटत नाही. खातेदाराला पैसे काय मिळत नाहीत. ज्येष्ठ नागरिक दिवसभर बसून कंटाळून निघून जातात, दुसरीकडे पैसे न मिळाल्यामुळे काहींचे चेहरे बघण्याजोगे होतात. जनसामान्यांना दु:खानं लपवता व दाखवताही येईना, अशी परिस्थिती झाली आहे.
पैसे बँकेतून निघनात मी काय करू ?
हल्ली वरबाप अनेक समस्यांतून आपल्या मुला-मुलीचं लग्न पार पाडत आहेत. त्यावेळी घोडे, वाजंत्री, फोटो, मंडपवाल्यांना चिरीमिरी देऊन बुकींग केलेले असतंय. वरबाप आपल्या लाडक्या मुला-मुलींचं ‘शुभमंगल, सगळ्यांना सावधान करीत असतात. नंतर मात्र ‘आत्ता तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा केले जातील,’ असे म्हणून मोकळे होतात. ‘पैसेच बँकेतून निघनात काय करू तेच कळना,’ त्यामुळे या सामान्य व्यावसायिकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आत्ता हे व्यावसायिक सावध राहून व्यवसाय करीत आहेत.
अबब..! एका महिन्यात ७०० खाती...
नोटाबंदीच्या या चलन कल्लोळामुळे जिल्हा बँक, पतसंस्था कोमात गेल्या असून, अन्य राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवहार जोमात चालू आहेत. ग्रामीण भागात ज्या बँकेकडे जेमतेम व्यवहार चालू होते, त्या बँकेत जुन्या नोटा नवीन करून मिळतात म्हटल्यानंतर खाते खोलण्यासाठी रांगा लागू लागल्या, अशामुळे या बँकेने ६०० ते ७०० खाती खोलण्याचा टप्पा पार केला.