अध्यक्षांना जागा बळकाविण्याची घाई
By admin | Published: February 15, 2016 10:49 PM2016-02-15T22:49:12+5:302016-02-15T23:57:54+5:30
मनोहर बर्गे : खरेदी-विक्री संघाच्या जागेत संघ स्वत: का व्यवसाय करत नाही?
वाठार स्टेशन : ‘वाठार स्टेशन येथील कोरेगाव खरेदी-विक्री संघाच्या इमारती समोर व्यापारी संकुल बांधायचं आणि आपल्याच पै-पाहुण्यांच्या नावाने हे गाळे स्वत: बळकावयाचं राजकारण सध्या कोरेगाव खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष व काही मागिल दाराने संघात आलेले संचालक करत आहेत,’ असा आरोप करीत जर या संकुलासाठी १६८ जण अर्ज करून व्यवसाय करत असतील तर मग संघ स्वत: का व्यवसाय करत नाही? असा सवाल खरेदी विक्री-संघाचे संचालक मनोहर बर्गे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
बर्गे म्हणाले, ‘वाठार स्टेशन येथे कोरेगाव खरेदी-विक्री संघाची अगदी मोक्याची ठिकाणी दीड एकर जागा आहे. या पैकी साडेतीन गुंठ्यात इमारत असून इमारती समोर असलेल्या मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा डाव अध्यक्ष व काही संचालक करत आहेत. खरंतर १५ वर्षांपासून या ठिकाणी केवळ खत विभाग व गोडाऊन एवढच कामकाज संघाकडून सुरू आहे. कोरेगाव संघाची कोरेगाव शहरातील मोक्याची जागा ज्या पद्धतीने पूर्वीच्या संचालकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बळकावली. त्याच पद्धतीने वाठार स्टेशनची जागा शॉपिंग सेंटरच्या नावाने बळकाविण्याचा डाव हे लोक करत आहेत. मूळात या ठिकाणी कोणतीही परवानगी नसताना अनाधिकृत इमारत बांधणार कशी? हाच प्रश्न आहे. जी अवस्था कोरेगावची झाली ती कोणत्याही परस्थितीत वाठार स्टेशनची होऊ देणार नाही,’ असा इशारा मनोहर बर्गे यांनी दिला आहे.
अध्यक्षांनी जर आपण शेतकरी असाल तर संघाशी व्यवहार करायला शिका, नंतरच संघाच्या हिताचे निर्णय घ्या असा सल्लाही बर्गे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
आम्ही संस्थेच्याविरोधात नाही; पण चुकीच्या गोष्टी चालू देणार नाही,
असे स्पष्टीकरणही बर्गे यांनी
दिले. (वातार्हर)
वाठार स्टेशन येथील खरेदी-विक्री संघाच्या जागेबाबत मनोहर बर्गे चुकीच्या पद्धतीने वक्तव्ये करत आहेत. मूळात संघ आज आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी वाठार स्टेशनच्या जागेत स्वत: संघाच्या वतीने बांधकाम करणार आहे. या साठी परिसरातील १६८ लोकांनी आमच्याकडे अर्ज दाखल केलेले आहेत. या माध्यमातून १ कोटी रुपयांचे डिपॉझिट मिळणार असून यातील व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी ६० लाख खर्च होणार आहेत.
- शहाजी भोईटे, अध्यक्ष
खरेदी-विक्री संघ, कोरेगाव