मारहाण करून मजुराचा निर्घृण खून
By admin | Published: October 14, 2016 12:30 AM2016-10-14T00:30:12+5:302016-10-14T00:30:12+5:30
‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलले : कऱ्हाड पोलिसांकडून कसून तपास
कऱ्हाड : येथील ईदगाह मैदानाजवळ बुधवारी रात्री मजुराचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. संबंधित मजुराचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याचा बेदम मारहाण करून खून करण्यात
आल्याचे गुरुवारी शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. खुनाचे कारण आणि मारेकरी यांच्याविषयी पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून, पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
सन्मुख बसू कोळी (वय ४५, रा. रत्नागिरी गोदामजवळ, कऱ्हाड. मूळ रा. जंबगी, जि. विजापूर) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत मृत सन्मुखची पत्नी मालम्मा कोळी हिने कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील जंबगी येथील सन्मुख कोळी हा सुमारे तीन वर्षांपूर्वी मजुरीनिमित्त कऱ्हाडात आला होता. त्यानंतर येथेच तो स्थायिक झाला. पत्नी व सहा मुलांसह तो शहरातील रत्नागिरी गोदामनजीक भाडेतत्त्वावरील खोलीत राहायचा. सन्मुख व त्याची पत्नी मालम्मा हे दोघेही मजुरीने खड्डे काढण्यासाठी जात
होते. दि. ११ आॅक्टोबर रोजी रात्री सन्मुख काही कामानिमित्त घरातून बाहेर पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. अशातच बुधवारी सायंकाळी शहरातील ईदगाह मैदान परिसरात निर्जनस्थळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, जोतिराम गुंजवटे हे अधिकाऱ्यांसह त्याठिकाणी आले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. तसेच त्याच्याजवळील वस्तूही ताब्यात घेतल्या. त्यानंतर चौकशी केली असता तो मृतदेह ान्मुख कोळी याचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर सन्मुखचे नातेवाईक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ओळखला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. प्रथमदर्शनी सन्मुखच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. मात्र, गंभीर दुखापत नसल्याने त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्टपणे सांगता येत नव्हते. अखेर शवविच्छेदनातून सन्मुखच्या मृत्यूचे कारण समोर आले. त्याच्या डोक्यावर, कानावर तसेच छातीवर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून, मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी पत्नी मालम्मा हिच्या फिर्यादीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
घटनेबाबत पोलिसांकडून सध्या सखोल तपास केला जात आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असल्याचे समजते. संशयित सापडल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे तपास करीत आहेत.