रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल
By नितीन काळेल | Published: May 25, 2023 03:32 PM2023-05-25T15:32:45+5:302023-05-25T15:34:46+5:30
रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे.
सातारा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कऱ्हाड येथून निघालेली रयत क्रांती शेतकरी संघटनेची 'वारी शेतकऱ्यांची ' पदयात्रा गुरुवारी दुपारी ढोल वाजवत साताऱ्यात धडकली. यावेळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी शासनाने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा दिला. तर शहरात येण्यापूर्वी सदाभाऊंनी शिवराज चौकात महामार्गावरच ठिय्या मांडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे. कऱ्हाड येथील महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करूनही यात्रा मार्गस्थ झाली. तीन मुक्कामानंतर ही यात्रा गुरुवारी दुपारच्या सुमारास सातारा शहरात आली. यावेळी शिवराज पेट्रोल पंप चौकात सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच शेतकऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या मांडला. यामुळे वाहतुकीला अडथळा आला. तसेच पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी विनंती केल्यानंतर सदाभाऊ पुन्हा पदयात्रेबरोबर चालत बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आले. त्यानंतर ही पदयात्रा जिल्हा परिषद मार्गे पोवई नाक्यावर आली. यावेळी शेकडो शेतकरी तसेच सरपंच परिषदेचे पदाधिकारी व ऊस वाहतूकदार सहभागी झाले होते.
पोवई नाक्यावर पदयात्रा आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मागण्याविषयी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सदाभाऊ खोत म्हणाले, आमच्या मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या आहेत. सरकारमधील काही मंत्री आम्हाला सामोरे येत आहेत. या शासनाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचे म्हणणे आम्हाला योग्य वाटले तर आम्ही थांबू. नाहीतर आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दरम्यान, सातारा येथून सदाभाऊ लगेच पुढे मार्गस्थ झाले. महामार्गाशेजारील यशोदा कॅम्पस येथे दुपारची विश्रांती त्यांनी घेतली.
या आहेत प्रमुख मागण्या...
रयत क्रांती संघटनेने विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली आहे. यामध्ये गुजरातच्या धर्तीवर उसाला दर देण्यात यावा. इथेनॉल निर्मितीसाठी शेतकरी कंपनीला परवानगी मिळावी. दोन साखर कारखान्यामधील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल अट बँकांनी बंद करावी. ऊस तोडणीचे करार महामंडळाच्या वतीने करण्यात यावेत. मुंबईत सरपंच भवन उभारण्यात यावे. सरपंचांनाही एसटीत मोफत प्रवास मिळावा, अशा या मागण्या आहेत.