मालवाहतुकीमुळे एस. टी. मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:50+5:302021-05-31T04:27:50+5:30

सातारा : कोरोनानंतर गेल्यावर्षी तब्बल सहा ते सात महिने एस. टी.ची चाकं एकाच ठिकाणी थांबली होती. त्यामुळे झालेले नुकसान ...

S. due to freight. T. Goods | मालवाहतुकीमुळे एस. टी. मालामाल

मालवाहतुकीमुळे एस. टी. मालामाल

Next

सातारा : कोरोनानंतर गेल्यावर्षी तब्बल सहा ते सात महिने एस. टी.ची चाकं एकाच ठिकाणी थांबली होती. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मालवाहतुकीचा पर्याय राज्य परिवहन महामंडळाने निवडला. त्याचा महामंडळाला फायदाही होत आहे. मात्र, या गाड्या घेऊन जाणाऱ्या चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे हाॅटेलही बंद असल्याने जेवणाची आबाळ होत आहे.

मध्यवर्ती कार्यालयाकडून मालवाहतुकीचा पर्याय खुला केला. मात्र, या क्षेत्राचा अनुभव नसल्याने ही सेवा कितपण यशस्वी होईल, हा प्रश्न होता. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले व इतर सहकारी अधिकाऱ्यांना घेऊन एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जात होते. त्याचा आता सकारात्मक परिणाम झालेला अनुभवायला मिळत आहे. लांब लांबच्या ऑर्डर मिळत आहेत. मात्र, या गाड्या घेऊन जाणाऱ्यांना काहीवेळेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी पदरमोड होत आहे. काही ठिकाणी मुक्कामाचीही सोय नाही, अशी तक्रार होत असते.

तीन कोटींची कमाई

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सहा महिने कसलेच उत्पन्न मिळाले नव्हते. त्यानंतर एस. टी. सुरू झाली, पण फारसा फरक पडला नाही. मात्र, मालवाहतुकीचा मोठा फरक जाणवत आहे.

ही सुविधा सुरू झाल्यापासून साताऱ्यातील उद्योजकांना नवा पर्याय मिळाला आहे. साहजिकच त्यातून एस. टी.ला कोट्यवधींचे उत्पन्न मिळत आहे.

या योजनेतून एस. टी.च्या तिजोरीत तब्बल तीन कोटी ११ लाख रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे या पडत्या काळात मोठा दिलासा मिळाला असल्याचे समजले जाते.

परतीचा माल मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

मालवाहतूक ट्रक घेऊन गेलेल्या चालकांना परतीचा माल मिळेपर्यंत तेथेच मुक्काम करावा लागतो. मात्र, त्यांच्यासाठी कंपनीत कसलीही सोय नसते. अनेकदा गाडीतच झोपावे लागते तसेच जवळच्या बसस्थानकात गेले तरी तेथे गैरसोय होते. प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचा अनेक चालकांना राज्यभरात अनुभव येत आहे. त्यामुळे ज्यांच्या जिवावर एस. टी.ला सोन्याचे दिवस बघायला मिळत आहेत, त्या चालकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी एस. टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.

पदरमोड करुन कसं परवडणार..!

एस. टी. घेऊन जाणाऱ्या चालक-वाहकांच्या जेवणाची सोय होते. मात्र, ट्रक घेऊन जाणाऱ्यांची होत नाही. त्यामुळे खिशातील पैसे घालून जेवावे लागते. एकावेळचे जेवण करायचे म्हटले तर किमान तीनशे रुपये खर्च येतो. अशावेळी पदरमोड करणे कसे परवडणार.

- एक चालक

एस. टी.चा प्रत्येक कर्मचारी एस. टी.ला दैवतच मानतो. मात्र, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना जी वागणूक मिळते, ती मालट्रकच्या चालकांना सातारा विभागाच्या बाहेर गेल्यावर मिळत नाही. त्यामुळे वाईट वाटतं. यासाठी वरिष्ठांनी स्थानिक प्रशासनाला सूचना कराव्यात.

- एक चालक.

आगाऊ रक्कम दिली जात नाही..!

राज्य परिवहन महामंडळाचा मालवाहतूक ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकांना प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाची आगाऊ रक्कम दिली जात नाही. त्यामुळे या प्रवासात होणारा खर्च खिशातूनच करावा लागतो.

महामंडळाचे प्रत्येक तालुक्यात आगार आहे. तेथे गाड्यांची दुरुस्ती, डिझेल उपलब्ध होत असते. त्यामुळे बाहेर खर्च करण्याची गरजच भासत नाही.

कंपनीकडून वाहतुकीचा खर्च मिळतो तो महामंडळाला परस्पर मिळत असल्याने चालकांना इतर स्वरुपात पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बाहेर गेल्यावर जेवण, राहण्याची सोय स्वखर्चातून करावी लागते.

नियमानुसार चालकांनी ट्रक घेऊन गेल्यानंतर दोन दिवसात तेथून परतीसाठी माल न मिळाल्यास ट्रक संबंधित आगारात जमा करुन अन्य एस. टी.ने स्वत:च्या आगारात यावे. मात्र, लाॅकडाऊन असल्याने आठ दिवस थांबावे लागते. त्यामुळे जेवणावरही विनाकारण खर्च वाढत जातो.

- जनक जाधव

अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना, सातारा आगार.

Web Title: S. due to freight. T. Goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.