एस. टी.तील पदाचे आरक्षण निवृत्तांना... सेवा ज्येष्ठतेवाले वेटिंगलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:50+5:302021-08-22T04:41:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पगारापेक्षा पदाला मान असतो. आपल्यालाही त्या खुर्चीत बसण्याचा मान मिळावा म्हणून असंख्य मंडळी आयुष्यभर ...

S. Reservation of posts in T. to retirees ... only waiting for service seniority! | एस. टी.तील पदाचे आरक्षण निवृत्तांना... सेवा ज्येष्ठतेवाले वेटिंगलाच !

एस. टी.तील पदाचे आरक्षण निवृत्तांना... सेवा ज्येष्ठतेवाले वेटिंगलाच !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पगारापेक्षा पदाला मान असतो. आपल्यालाही त्या खुर्चीत बसण्याचा मान मिळावा म्हणून असंख्य मंडळी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करत असतात. पण अशा सेवाज्येष्ठतेवाल्यांना डावलून निवृत्त अधिकाऱ्यांनाच वरच्या पदावर नेमण्याची पद्धत एस. टी. महामंडळात सुरू झाली आहे. ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त पदभार दिल्यास दोन-चार हजारांत काम होते तेथे सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचा भार एस. टी.ला सोसावा लागत आहे.

सुसाट धावत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची चाकं कोरोनानंतर अडखळू लागली आहेत. खासगी शिवशाही गाड्या, तिकीट मशीन व्यवहारामुळे एस. टी. महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर येत असतानाच आणखी एक प्रकार समोर येत आहे. कोरोनानंतर महामंडळाने ठराविक वर्षे सेवा केलेल्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यामुळे पगारावर होणाऱ्या खर्चात बचत होण्याची आशा होती. मात्र त्याला कर्मचाऱ्यांतून म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही हा भाग वेगळा. पण त्याचवेळी प्रशिक्षण घेत असलेल्या चालक-वाहकांना सेवेत घेण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

त्याचवेळी दुसरीकडे मात्र वर्ग एक आणि दोन पदांवरील एखादा मर्जीतील अधिकारी निवृत्त झालेला असल्यास त्याला लगेच सेवेत रुजू करुन घेतले जात आहे. अशीच संधी मिळालेला एक निवृत्त अधिकारी आपण परत आलोय... व्यवस्थापनाच्या जवळचा आहे हे ती व्यक्ती कामातून सतत दाखविण्याचा प्रयत्न करत असते. कोरोनामुळे एस. टी.ची आर्थिक घडी विस्कटलेली असताना ती सावरण्यासाठी या अधिकाऱ्यांकडून विशेष प्रयोग होतानाही दिसत नाहीत. गेल्या काही महिन्यांत उत्पन्न वाढीसाठी, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगळा प्रयोग केला असेही झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक विभागीय स्तरावर आपापल्यापरिने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला कशासाठी संधी दिली जात आहे, हा प्रश्न विचारला जात आहे.

एखाद्या पदावर कित्येक वर्षे काम केल्यानंतर अनुभव गाठीशी आलेला असतो. निवृत्तीनंतर त्याच पदावर संधी मिळाली तर सोनं करता येईल. पण ज्या पदावर आयुष्यभर काम केले नाही, तेथेच नेऊन प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे आपण स्वप्न पाहिलेल्या पदावर पोहोचणार नसू तर आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करुन काय फायदा, असा सूर निघू लागला आहे.

चौकट

अनेक प्रश्न अनुत्तरीत

सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिलेल्या व्यक्तीकडून काही चुकीचे निर्णय झाले किंवा गैरव्यवहार झाला तर सेवेत असल्याने त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरता येते. मात्र निवृत्तीनंतर काही वर्षांसाठी आलेली व्यक्ती किती उत्तरदायी असेल, हा प्रश्नच असतो.

मानधनावर खर्च कशाला

कोरोनामुळे एस. टी. तोट्यात आहे. म्हणून एकीकडे कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मागवला आहे. दुसरीकडे या पदावर आणलेल्या अधिकाऱ्यांना मात्र सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे मानधन दिले जात आहे. याच पदाची अतिरिक्त जबाबदारी सेवाज्येष्ठतेनुसार दिली तर चार-पाच हजारात कर्मचारीआनंदात काम करेल. मग मानधनावर खर्च कशासाठी, हा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: S. Reservation of posts in T. to retirees ... only waiting for service seniority!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.