एस. टी.त पाझरला माणुसकीचा झरा!
By admin | Published: September 5, 2014 09:33 PM2014-09-05T21:33:51+5:302014-09-05T23:23:27+5:30
चालक-वाहकांचे प्रसंगावधान : पसरणीतील कावीळग्रस्त रुग्णाला नेले रुग्णालयात
वाई : माणुसकी हरवत चालल्याची भावना नित्याचीच झाल्यासारखी असतानाच पसरणी, ता. वाई येथील महांगडे कुटुंबीयांना मात्र आलेल्या त्यांच्या संकटमयवेळी वेगळाच अनुभव आला आणि माणुसकी आजही जिवंत आहे. माणूसपण आजही हरवलं नाही, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. त्या कठीण प्रसंगी धावत्या एस. टी. बसमधील चालक-वाहकांसह प्रवाशांनी केलेल्या मदती व सहकार्याने एका रुग्णांचा जीव वाचला आहे.
पसरणी, ता. वाई येथील नंदकुमार महांगडे (वय ४५) काही दिवस ताप आणि कावीळ याने आजारी होते. कावीळीचा आजार रक्तात उतरल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेहण्याचे ठरले. त्यांचे बंधू भगवान महांगडे आणि नंदकुमार महांगडे यांना मुंबईला जाण्यासाठी वाई-कल्याण ही एस. टी. वाईतून पकडली. यावर चालक आर. डी. कुंभार व वाहक ए. ए. कांबळे हे होते.
बस वाईहून मुंबईला निघाली. एस. टी. पुणे येथून मुंबई रस्त्याला निघणार त्यावेळी नंदकुमार महांगडे यांची प्रकृती जास्तच खालवली. ते बेशुध्द अवस्थेत गेले. आता काय करायचं? हा मोठा कठीण प्रसंग उभा राहिला.
वाहक-चालक व एस. टी.तील प्रवाशी यांनी निर्णय घेऊन एस. टी. जवळच्या पुणे येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. व माणुसकीपण जपत रुग्णाला खाली उतरवून सर्वांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले.
महांगडे यांच्यावर तातडीने उपचार होऊन त्यांचा जीव वाचला. महांगडे कुटुंबीयांनी वाईमध्ये आल्यावर वाहन चालक आर. डी. कुंभार व वाहक ए. ए. कांबळे यांची भेट घेऊन वाई आगारात त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
प्रवाशांचीही सजगता
एकतर मुंबईकडे जाणारा प्रवाशी नेहमी घाईत असतो. त्यांच्याकडे वेळ कमी असतो; परंतु प्रवाशांनी एस. टी. खासगी रुग्णालयात नेहून स्वत: मदत केली. आपला वेळ दिला, याबाबत महांगडे यांनी सर्वांचे आभार मानले.