एस. टी. बससेवा तातडीने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:07+5:302021-08-22T04:41:07+5:30
उंब्रज : उंब्रज बसस्थानकातून सुरू असणाऱ्या पाल, चोरे, चोरजवाडी, चाफळ या परिसरातील गावांमधील एस. टी.ची बससेवा कोरोनाच्या काळात ...
उंब्रज : उंब्रज बसस्थानकातून सुरू असणाऱ्या पाल, चोरे, चोरजवाडी, चाफळ या परिसरातील गावांमधील एस. टी.ची बससेवा कोरोनाच्या काळात बंद करण्यात आली. ती अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. ही एस. टी. बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे पाल येथील माजी विभागप्रमुख राहुल ढाणे यांनी केली आहे.
याविषयी कऱ्हाड आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनानुसार, सध्या कोरोना महामारीमुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी.च्या मर्यादित फेऱ्या कऱ्हाड तालुक्यामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या फेऱ्या सुरू करताना तालुक्याच्या सर्व भागांमध्ये समान पद्धतीने सेवा मिळणे अपेक्षित होते; परंतु सध्या उंब्रज या मध्यवर्ती ठिकाणापासून पाल, चोरे, चोरजवाडी, चाफळ व परिसरातील गावांसाठी असलेली एस. टी. सेवा बंद आहे. यामुळे या विभागातील जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्वत:ची वाहने असणारे लोक आर्थिक भुर्दंड सहन करून आपली वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक तसेच व्यावसायिक कामे पार पाडत आहेत. ज्यांच्याकडे वाहने उपलब्ध नाहीत, त्या ग्रामस्थांची मात्र कुचंबणा होत आहे. इंदोली तसेच उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना बससेवा नसल्याने खासगी दवाखान्यात जाऊन आर्थिक झळ सोसावी लागत आहेत. तसेच विद्यार्थी वर्ग प्रचंड विवंचनेत आहे. त्यामुळे उंब्रज बसस्थानकातून या मार्गावर काही फेऱ्या तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती परिवहन मंत्री अनिल परब, जिल्हाधिकारी सातारा व एस. टी. महामंडळाचे सातारा येथील विभागीय नियंत्रक यांना देण्यात आल्या आहेत.