‘एस’ वळणाने घेतला आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:17 PM2019-01-13T23:17:18+5:302019-01-13T23:17:24+5:30
खंडाळा : पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणाऱ्या धोकादायक ‘एस’ वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण ...
खंडाळा : पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणाऱ्या धोकादायक ‘एस’ वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. अशोक शामराव जाधव (वय ३९, रा. बोपेगाव, ता. वाई) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.
खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीहून मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेला कंटेनर (एमएच १५ इजी ९६१२) हा खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर भरधाव एस वळणावरून निघाला होता. त्यावेळी पुढे धान्य कोठी घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरला (एमएच ११ बीए ७७१९) त्याने जोराने धडक दिली. धडकेनंतर सुमारे शंभर फूट ट्रॅक्टरला पुढे रेटत पुलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला, तर ट्रॅक्टरचा चुराडा झाला.
या अपघातात ट्रॅक्टरचालक अशोक शामराव जाधव हे ठार झाले, तर बाळासाहेब जाधव (४२, पांडे, ता. वाई), कंटेनर चालक संदीप सुभाष निर्भवणे (२७), अमोल काशिनाथ वाघ (२४, दोघेही रा. शिवरे, ता. निफाड, जि. नाशिक) हे तिघेजण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला. कंटेनर चालकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कंटेनर अन् कठड्यामध्ये ट्रॅक्टरचा चुराडा
महामार्गावरील या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, कंटेनरमधील साखरेची पोती रस्त्यावर पसरली होती. कंटेनर आणि पुलाचा कठडा यामध्ये ट्रॅक्टरचा चुराडा झाला. यात अशोक जाधव पूर्णपणे चेपले गेले. छाती, पोट व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातास कंटेनरचा भरधाव वेग व चालकाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याची तक्रार नातेवाइकांनी पोलिसांत दिली आहे.