सातारा : ‘सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयात धुम्रपान करण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाºयांवर व शासकीय कार्यालयात धुम्रपान करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा,’ अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग प्रतिबंध सप्ताहनिमित्त आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, पोलिस निरीक्षक ए. डी. फडतरे, दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप, डॉ. योगीता शहा आदी उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारी यादव म्हणाले, ‘तंबाखुच्या व्यसनामुळे कर्करोगासारख्या आजाराचा प्रादुर्भाव होवू शकतो. शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसराच्या १०० मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री तसेच सेवनाला बंदी असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत.
विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य व तंबाखूमुक्त शाळा याबाबत शिक्षकांनी माहिती द्यावी. तंबाखू सेवनामुळे होणारे आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.’ यावेळी डॉ. योगीता शहा यांनी तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली
|