सातारा : येथील सातारा रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आणि गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेली संस्था गिरीप्रेमी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरामध्ये ‘गिरीप्रेमी ८००० क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते या क्लबचे समन्वयक डॉ. संदीप श्रोत्री, मिलिंद हळबे आणि रानवाटा मंडळाच्या अध्यक्षा सीमंतिनी नूलकर यांना या अनोख्या क्लबची सूत्रे सोपविली व क्लब स्थापन झाल्याची अधिकृत घोषणा केली.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील साहसी पर्यटन अधिक सुरक्षित व्हायला हवे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून या क्लबची स्थापना झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक फारोख कूपर, मुंबई येथील उद्योगपती आणि गिर्यारोहक जयसिंह मरीवाला, गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आनंद पाळंदे, लेखिका उषप्रभा पागे, एव्हरेस्टसह अनेक गिरीमोहीमा यशस्वी करणारे उमेश झिरपे हे उपस्थित होते. सातारा जिल्ह्याला साहसी गिर्यारोहण, ट्रेकिंग, वन्यजीव अभयारण्ये, तसेच रॅपलिंग आदी क्रीडा प्रकारांना निमंत्रण देणाºया निसर्गाचे वरदान मिळालेले आहे. रानवाटा मंडळ नेहमीच अशा पर्यावरणप्रेमी पर्यटनाला प्रोत्साहन देत असते.
सध्या अशा साहसी क्रीडाप्रकारांमध्ये उतावळ्या आणि सवंग प्रसिद्धी मिळविणाºया तरुणाईचे आणि अशा मोहिमा पूर्वतयारी न करता केवळ गल्लाभरू आयोजक संस्थांचे पेव फुटलेले आहे. अपुºया तयारीनिशी आणि अचूक माहिती न घेता अशा मोहिमा राबविल्या जातात आणि कितीतरी उतावीळ आणि अतिउत्साही तरुण त्यामध्ये बळी पडतात. आपल्या जिल्ह्यामध्ये साहसी पर्यटन सुरक्षित व्हायला हवे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे ‘गिरीप्रेमी ८००० क्लब-सातारा विभाग’ या क्लबची रितसर स्थापना रानवाटा मंडळाच्या पुढाकाराने झाली आहे, असे डॉ. श्रोत्री यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले. या क्लब स्थापनेमागील उद्देश आणि सभासदांना मिळणारे फायदे विषद करून गिरीप्रेमी संस्थेचे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सातारा जिल्ह्यातील तरुण पिढीला या क्लबमुळे निश्चितच प्रेरणा मिळेल असे सांगितले. नगराध्यक्ष कदम यांनी या कार्यक्रमासाठी सातारा नगरपालिका मदत करेल असे सांगितले. सभासद झालेले सातारा शहरातील बाळकृष्ण जोशी, डॉ. मिलिंद शहा, डॉ. नावंधर, नीलकंठ पालेकर आदी पंधरा जणांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, डी. व्ही. पाटील, डॉ. निर्मला सुपेकर, डॉ. चारुलता शहा, कराड अर्बन बँकेचे काकडे, वनविभागाचे आडे आदी मान्यवर उपस्थित होते. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रानवाटा मंडळाचे कार्यवाह विशाल देशपांडे यांनी आभार मानले.
|