लोणंदच्या नगराध्यक्षपदी सचिन शेळके यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:54 PM2018-10-26T22:54:32+5:302018-10-26T22:54:36+5:30
लोणंद : लोणंद नगरपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्टÑवादीने बाजी मारली असून, राष्टÑवादी काँग्रेस-भाजप आघाडीचे सचिन नानाजी शेळके यांची तर ...
लोणंद : लोणंद नगरपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्टÑवादीने बाजी मारली असून, राष्टÑवादी काँग्रेस-भाजप आघाडीचे सचिन नानाजी शेळके यांची तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे किरण चंद्रकांत पवार यांची नऊ विरुद्ध सहा मतांनी निवड झाली.
सचिन शेळके यांनी काँग्रेसच्या स्वाती भंडलकर यांचा तर उपनगराध्यक्ष किरण पवार यांनी मेघा आप्पासाहेब शेळके यांचा नऊ विरुद्ध सहा मतांनी पराभव केला. काँग्रेसचे नगरसेवक विकास केदारी हे गैरहजर राहिले, तर विद्यमान नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील यांना जिल्हाधिकारी यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्र ठरविल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.
योवेळी स्वीकृत नगरसेवक अॅड. बाळासाहेब बागवान, अॅड. सुभाष घाडगे उपस्थित होते. पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजूरकर व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली.
नगराध्यपदाच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतीच्या चोहोबाजूला सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नगरपंचायतीच्या आजूबाजूची शंभर मीटरपर्यंतची सर्व दुकाने बंद ठेवली.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदांच्या निवडी घोषित होताच लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणावर राष्टÑवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत गुुलालाची उधळण केली.
नगराध्यक्षांना भोवले अनधिकृत बांधकाम
लोणंदच्या नगराध्यक्षपदाच्या निवडी वेळी विद्यमान नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला. नगराध्यक्षांच्या मुलांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. अनधिकृत बांधकामाची सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. याबाबतचा निकाल मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला होता. नेमका नगराध्यपदाच्या दिवशीच निकाल दिला.