शेतकरी आंदोलनाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टीसह सदाभाऊ खोत दोषमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:41+5:302021-01-16T04:43:41+5:30

कऱ्हाड : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोव्हेंबर २०१२ व नोव्हेंबर २०१३ अशी दोन वेळा आंदोलने केली. या आंदोलनात ...

Sadabhau Khot along with Raju Shetty acquitted of the crime of farmers' agitation | शेतकरी आंदोलनाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टीसह सदाभाऊ खोत दोषमुक्त

शेतकरी आंदोलनाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टीसह सदाभाऊ खोत दोषमुक्त

Next

कऱ्हाड : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोव्हेंबर २०१२ व नोव्हेंबर २०१३ अशी दोन वेळा आंदोलने केली. या आंदोलनात वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळही झाली होती. आंदोलनादरम्यान माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यावर कऱ्हाडात वेगवेगळे ४७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४५ खटल्यांतून त्यांची यापूर्वीच निर्दोष मुक्तता झाली होती. तर शुक्रवारी उर्वरित दोन गंभीर खटल्यातून न्यायालयाने दोघांना दोषमुक्त केले.

येथील अतिरिक्त जिल्हा न्या. एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. बचाव पक्षाचे वकील म्हणून अ‍ॅड. संग्रामसिंह निकम यांनी काम पाहिले. खटल्याबाबत अ‍ॅड. संग्रामसिंह निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील वाठार येथे नोव्हेंबर २०१२ मध्ये पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाहनांचे टायर पेटवून महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले होते. याबाबत पोलिसांच्यावतीने हवालदार खलील इनामदार यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, तत्कालीन खा. राजू शेट्टी यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे प्रेरित होऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रस्त्यावर फेकले. तसेच पोलीस वाहने, एसटी बस व इतर खासगी अशा दहा वाहनांवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत दोन पोलीस निरिक्षकांसह अन्य दोन अधिकारी व चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे तसेच वाहनांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. याबाबत जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्यासह अन्य कलमांन्वये आरोप ठेवण्यात आले होते.

पाचवड फाटा येथे नोव्हेंबर २०१३ मध्येही ऊस दरप्रश्नी स्वाभिमानीने आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान वाठार येथे कुरुंदवाड आगाराच्या एसटीवर दगडफेक झाली होती. त्यामध्ये चालक सोमेश्वर वळवी जखमी झाले होते. त्यांच्या फिर्यादीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व इतर गुन्हे राजू शेट्टी यांच्यावर दाखल करण्यात आले होते. या दोन्ही खटल्याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर झाली. त्यामध्ये शेतकरी कार्यकर्त्यांच्या तथा बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. संग्रामसिंह निकम यांनी युक्तिवाद व पुरावे सादर केले. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. औटी यांनी प्रत्यक्ष घटनेवेळी राजू शेट्टी हे उपस्थित नसल्याचे मत नोंदवत दोघांची या दोन्ही खटल्यातून शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.

- चौकट

एकात ८, तर दुसऱ्या गुन्ह्यात २४ आरोपी

तत्कालीन खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर एकूण ४७ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ४५ गुन्ह्यातून माजी खासदार शेट्टी, सदाभाऊ खोत यांची यापूर्वीच निर्दाेष मुक्तता झाली आहे. तर शुक्रवारी दोघांना उर्वरित दोन गंभीर गुन्ह्यांच्या आरोपातून न्यायालयाने दोषमुक्त केले. त्या दोन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात आठ आरोपी होते. त्यापैकी दोघे दोषमुक्त झाल्याने उर्वरित सहाजणांवर खटला सुरूच आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात २४ आरोपी होते. त्यापैकी आता २२ जणांवर खटला सुरू राहणार आहे.

Web Title: Sadabhau Khot along with Raju Shetty acquitted of the crime of farmers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.