सदाशिवराव पोळ यांचे निधन
By admin | Published: October 1, 2015 12:18 AM2015-10-01T00:18:33+5:302015-10-01T00:39:43+5:30
आज अंत्यसंस्कार : माण तालुक्यातील ‘किंगमेकर’ हरपला
म्हसवड : राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सदाशिवराव पोळ (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वडूज येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, दोन मुली, आठ भाऊ व एक बहीण, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माण तालुक्याच्या राजकारणावर गत ५० वर्षे अधिराज्य गाजविणारे ‘किंगमेकर’ म्हणून सदाशिवराव पोळ यांची जिल्ह्यात ओळख होती. १९६७ मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून माणच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रांत प्रवेश केला. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ते माण पंचायत समितीचे सभापती झाले. १७ वर्षे सभापती म्हणून त्यांनी तालुक्याच्या राजकारणावर पकड मिळविली. २००२ ते २००८ या काळात त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले. आपल्या विचारांचे दोन आमदार त्यांनी निवडून आणले होते. त्यामुळे त्यांना ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जात होते. दरम्यान, माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्यावर गुरुवारी (दि. १ आॅक्टोबर) सकाळी ९ वाजता मार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या निधनाची बातमी तालुक्यात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आधार हरपल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)