घोड्यामागून सफाई कामगारांची वरात !
By admin | Published: December 23, 2014 12:31 AM2014-12-23T00:31:27+5:302014-12-23T00:31:27+5:30
महाबळेश्वर : व्यावसायिकांचा घोड्यांसह पालिका, वन विभाग कार्यालयावर मोर्चा
महाबळेश्वर : समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या घोडेस्थानकावर घोडे व्यावसायिकांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच सुशोभीकरणाच्या नावाखाली बंद करण्यात आलेला मुंबई पॉइंट येथील घोडे चालविण्याचा ट्रॅक सुरू करावा, या मागण्यांसाठी शहरातील घोडे व्यावसायिकांनी कुटुंबीय व घोड्यांसमवेत पालिका आणि वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, मुख्य बाजारपेठेतून घोडे गेल्याने सर्वत्र लीद पडली होती. दुर्गंधी पसरल्याने सफाई कामगारांनी लगेच स्वच्छता करण्यास सुरुवात केली.
महाबळेश्वर येथे ब्रिटिश काळापासून घोडे व्यवसाय सुरू आहे. शहर व परिसरातील पॉइंटवर व्यवसाय करून अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करतात. घोडे व्यावसायिकांसाठी बसस्थानकासमोर पोनी स्टँड आहे. या ठिकाणी सध्या कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. घोड्यासाठी पिण्याचे पाणी किंवा निवाराही नाही. घोडे उभे करण्यासाठी जागा अपुरी आहे. तसेच या स्टँडची देखभाल, दुरुस्ती पालिका करीत नाही. या ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी घोडे व्यावसायिक मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. पालिकेने या मागण्यांचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. प्रत्येकवेळी आश्वासनावर घोडे व्यावसायिकांची बोळवण करण्यात येत होती. त्यामुळे व्यावसायिकांत संताप व्यक्त होत होता. यामधूनच घोडे व्यावसायिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. मात्र, पालिकेच्या गेटवरच मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर घोडे व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने प्रथम मुख्याधिकारी सचिन पवार व त्यानंतर नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
दोघांनीही घोडे व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत पालिका सहानुभूतीने विचार करेल, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबई पॉइंट येथील घोडे चालिवण्याचा ट्रॅक बंद करण्यात आला आहे. येथे सूर्यास्ताच्या वेळी पर्यटकांची मोठी गर्दी होते. ब्रिटिश काळापासून असणारा हा ट्रॅक बंद असल्याने घोडे व्यावसायिकांच्या व्यावसायावर त्याचा परिणाम झाला आहे. हा ट्रॅक सुरू करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला. वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. वरिष्ठांबरोबर चर्चा करून त्यांनी परवानगी दिल्यानंतर टॅ्रक सुरू करण्यात येईल, असे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले.
मोर्चा पंचायत समितीपासून सुरू झाला. तो मस्जिद रोडमार्गे शिवाजी चौक व तेथून वन विभागाच्या कार्यालयावर गेला. त्यानंतर बाजारपेठमार्गे मोर्चा पोलीस ठाण्यावरून बसस्थानकमार्गे पालिकेजवळ पोहोचला. या मोर्चात माजी नगरसेवक सज्जादभाई वारुणकर, संघटनेच अध्यक्ष जावेद खारखंडे, उपाध्यक्ष ताजुद्दीन वढाणे, डॉ. बशीर डांगे, आनिस बेपारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)