सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ हे संस्कारकेंद्र
By Admin | Published: September 2, 2014 11:45 PM2014-09-02T23:45:46+5:302014-09-02T23:45:46+5:30
शिक्षण उपसंचालकांकडून गौरव : सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उत्साहात प्रारंभ
पुसेगाव : ‘पुसेगाव परिसरात विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सुसंस्काराची पेरणी करून त्यांच्या आयुष्याला उभारी देणारे श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ हे या परिसराचे संस्कारकेंद्र म्हणून उभे राहिले आहे,’ असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी केले.
येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ गोंधळी यांच्या हस्ते झाला.
अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव होते. कार्यक्रमास श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, शिक्षणाधिकारी आर. एन. चव्हाण, डी. एम. भोसले, गटशिक्षणाकारी अनिस नायकवडी, एम. बी. हगवणे, संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव डॉ. सुरेश जाधव, संचालक मोहनराव जाधव, सरपंच मंगल जाधव, गुलाबराव वाघ, मानाजीराव घाडगे, प्राचार्य डी. पी. शिंंदे आदी उपस्थित होते.
गोंधळी म्हणाले, ‘संस्थेची गेल्या ५० वर्षातील वाटचाल म्हणजे इंद्रधनू होय. आयुष्याच्या वळणावर निसर्ग, ग्रंथ, शिक्षक अनेकविध क्षेत्रांतील अनेक गुरू भेटतात. पण आई हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे. आई-वडील आपार कष्ट करतात म्हणूनच आपण शिक्षण घेऊ शकतो याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी.’
अतिरिक्त जिल्हाधिकारी यादव म्हणाले, ‘नोकरी वशिल्याने नव्हे तर स्वप्रयत्नाने मिळू शकते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिक प्रयत्नाद्वारे स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करावा.’
यावेळी पुसेगाव, जाखणगाव, राजापूर, जांब व रणसिंंगवाडी येथील शाळांनी तयार केलेल्या विविध चित्ररथांची विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणूक काढली. (वार्ताहर)