सहकाराला संस्काराची जोड आवश्यक : शेखर चरेगावकर
By admin | Published: April 22, 2017 05:19 PM2017-04-22T17:19:22+5:302017-04-22T17:19:22+5:30
लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचा प्रारंभ
आॅनलाईन लोकमत
खटाव (जि. सातारा), दि. २१ : सहकार क्षेत्रामध्ये नवनवीन बदल व कडक कायदे करण्यात आले आहेत. परंतु या सहकार क्षेत्राचे प्रणेते तसेच दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांना अभिप्रेत असणारी विना संस्कार नही सहकार ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. सहकार क्षेत्रात वाढलेला स्वाहाकार थोपवण्यासाटी सर्व सहकार कायद्यावर संस्कार करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.
खटाव येथे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश व गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु व सहकार भारतीचे संस्थापक आणि खटाव गावाचे सुपुत्र लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथ यात्रेचा शुभारंभ करताना चरेगावकर बोलत होते.
ही रथ यात्रा दि. २३ रोजी मुंबई येथे होणाऱ्या १0 व्या सहकार भारतीच्या प्रदेश अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.
या रथयात्रेच्या शुभारंभप्रसंगी प्रदेश संघटक प्रवीण देशपांडे, सातारा जिल्हा संघटक सुरेश जोशी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, युवा मोचार्चे राज्य सरचिटणीस अतुल भोसले, कार्याध्यक्ष महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, मधुकर पाटोळे, अशोक कुदळे, रमणलाल शहा, सहकार भारतीचे जिल्हा संघटक सुरेश जोशी, सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव विनायक खटावकर, मधुकर इनामदार, सुहास जोशी, सुजाता खटावकर, सनी शहा, दिलीप जोशी, डॉ. दर्भे, संजय टकले, रणधीर जाधव, सतीश फडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)
तरच भ्रष्टाचाराला आळा...
माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर नेहमीप्रमाणे टिकास्त्र सोडले. शेतकऱ्यांचे कैवारी बनून संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. कर्जमाफी करावयाला आमचा विरोध नाही. परंतु सर्वसामान्य शेतकरी हा कर्ज वेळेत भरत आहे आणि टगी मंडळी मात्र कर्ज माफीच्या आशेवर कर्ज फेडत नाहीत. आमची शासनाला व सहकार खाात्याला विनंती आहे की ज्यांनी वेळेत कर्ज फेडली आहेत त्यांचे निम्मे कर्ज शासनाने माफ करावे आणि ज्यांनी कर्जच फेडले नाही त्यांच्याकडून ते सरसकट वसूल करुन घ्यावे. यामुळे सहकार क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार व हुकुमशाहीला लगाम बसेल असे त्यांनी सांगितले.