साहेब कार्यालयात भेटेनात; फोनही घेईनात!
By admin | Published: March 19, 2015 09:35 PM2015-03-19T21:35:05+5:302015-03-19T23:52:43+5:30
दादा मागायची कुणाकडं ? : तारळेतील वीज ग्राहकांसमोर यक्षप्रश्न; उंब्रजच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया
तारळे : वीजग्राहकांना तक्रार करण्यासाठी, शंका निरसन करण्यासाठी अथवा अधिक माहिती घेण्यासाठी उंब्रज येथील वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना मोबाईलवर फोन करावा लागतो. मात्र, संबंधित अधिकारी फोनच घेत नाहीत. कार्यालयाच्या दूरध्वनीवर फोन केला असता, साहेब बाहेर गेल्याची उत्तरे मिळतात. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.उंब्रज येथे वीजवितरण कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. तारळे येथे शाखा आहे. तारळे विभागात हजारो घरगुती व कृषिपंंपांचे ग्राहक आहेत. त्यामुळे ग्राहकांना वारंवार उंब्रज कार्यालयाशी संपर्क करावा लागतो; पण सध्याचे अधिकारी ग्राहकांचे फोन घेत नसल्याचे समोर येत आहे. यापूर्वी अनेक अधिकारी आले आणि गेले; पण कुणीही ग्राहकांचे फोन घेण्यास टाळाटाळ केली नाही. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे सुध्दा फोन सध्या उचलले जात नाहीत. तारळे-उंब्रज सुमारे पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे. ग्राहक पदरमोड करून गेले तरी अधिकारी जागेवर सापडतीलच, याची खात्री नसल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे एखाद्या शंकेचे निरसन, माहिती घ्यायची झाल्यास ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. मुळात अधिकारी बदलले तरी ग्राहकांच्या सोयीसाठी तोच नंबर नवीन अधिकाऱ्यांकडे देण्यात येतो; पण सध्या उलट परिस्थिती असून, अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
अनेक कामांसाठी ग्राहकांना उंब्रज कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे जावे लागते. त्यांच्याकडून दिलेल्या माहितीवरच समाधान मानावे लागते. आमच्याकडे तक्रारदार आल्यास त्याबाबत अधिकाऱ्यांना वेळ मागून घेण्यासाठी मोबाईलवर फोन केला असता उचलला जात नाही. यापूर्वी अशा प्रकारे फोन न उचलण्याचे प्रकार घडत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी केली आहे. वीज वितरणात अनियमितता, दुरुस्ती असल्यास विलंब, अवाजवी बिले अशा तक्रारी असताना हे नवेच दुखणे ग्राहकांमागे लागले आहे. (वार्ताहर)
ग्राहकांच्या शंकांचे निरसन होण्यासाठी अधिकाऱ्यांनी फोन उचलणे गरजेचे आहे. उंब्रजचे उपकार्यकारी अभियंता फोन का घेत नाहीत, याची मी माहिती घेतो. त्यांना योग्य ती समज दिली जाईल. यापुढे असे होणार नाही.
- राजेश थूल,
कार्यकारी अभियंता, ओगलेवाडी
साहेब प्रतिसाद देत नाहीत म्हणे !
उपकार्यकारी अभियंत्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क केला; पण सलग तीन दिवस वारंवार फोन करूनही त्यांनी फोन घेतलाच नाही. ‘तुम्ही ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता, तो क्रमांक सध्या कोणतेही कॉल स्वीकारत नाहीये,’ अशी टेपच वारंवार ऐकावी लागत होती. साहेब, प्रतिसादच देत नसल्याने आता दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न सध्या वीज ग्राहकांना सतावतोय.