Video : ‘सह्याद्री’, ‘कृष्णा’ कारखान्याची ऊस वाहतूक रोखली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:57 PM2018-11-11T14:57:26+5:302018-11-11T15:07:18+5:30
ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग वाढत असून, रविवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कऱ्हाड : ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग वाढत असून, रविवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी कऱ्हाडनजीक पाचवड फाटा येथे रास्ता रोकोचा प्रयत्न केला. तसेच सह्याद्रीसह कृष्णा कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही वाहने सोडून देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊसदराबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, तरीही काही कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत कारखाने दर जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत महामार्ग रोखण्याचा इशारा संघटनेने दिला होता. या इशाऱ्यानंतर शनिवारी रात्रीपासून स्थानिक प्रशासन सतर्क झाले होते. कऱ्हाड उपविभागात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठीकाणी आंदोलनास सुरुवात केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह आंदोलकांनी गुहाघर-विजापूर राज्यमार्गावर मसूर येथे रास्ता रोको केला. तसेच सह्याद्र्री कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतुकीची वाहने रोखून धरली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तालुक्यातील वाठार येथे संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, तालुकाध्यक्ष बापू साळुंखे, युवा आघाडी अध्यक्ष प्रदीप मोहिते यांच्यासह आंदोलकांनी कृष्णा कारखान्याला ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली. याबाबतची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आंदोलकांना समज देऊन संबंधित वाहने कारखान्याकडे रवाना केली. दरम्यान, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाचवड फाटा येथे आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. उपमार्गावर आंदोलक एकत्र जमले. त्याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत कारखानदार दर जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी उसाला तोड घेऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.