सह्याद्री कारखाना निवडणूक : बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:00 PM2020-01-09T17:00:17+5:302020-01-09T17:03:10+5:30
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ८७ अर्जांची विक्री झाली तर २१ जणांनी अर्ज दाखल केले.
कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ८७ अर्जांची विक्री झाली तर २१ जणांनी अर्ज दाखल केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कऱ्हाडचे सहकारी संस्थेचे उपनिबंधक मनोहर माळी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, नंदकुमार बटाणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार, दि. ६ रोजीपासून शुक्रवार, दि. १० रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. कारखान्याच्या संचालक मंडळात कऱ्हाड , तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली, महिला राखीव, अनुसूचित जाती/जमाती, भटक्या जाती/विमुक्त/ प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग अशा दहा गटांतून एकूण २१ सदस्य आहेत.
त्यामध्ये गुरुवारी कऱ्हाड गटातून जयवंत जगन्नाथ पाटील, जयदीप जालिंदर यादव, युवराज विठ्ठल सावंत, शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, जशराज शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी तर तळबीड गटातून संपत राघू घाडगे व हिंदुराव केसू चव्हाण यांनी अर्ज दाखल केले. कोपर्डे हवेली गटातून अर्जुन कृष्णा माने, निवास प्रतापराव चव्हाण, आनंदराव उत्तम चव्हाण यांनी अर्ज दाखल केले.
मसूर गटातून प्रल्हाद भार्गव सूर्यवंशी, साहेबराव पांडुरंग साळुंखे, मानसिंगराव वसंतराव जगदाळे, संतोष शिदोजीराव घार्गे यांनी तर वाठार किरोली गटातून शिवाजी विश्वासराव घाडगे, शिवाजी पंढरीनाथ साळुंखे, विठ्ठलराव सर्जेराव घोरपडे, दिलीप बाबासो मोरे यांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती-जमाती गटातून जयवंत संपतराव थोरात व पुरुषोत्तम शंकर बनसोडे यांनी असे एकूण २१ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार, दि. १० रोजीपर्यंत आहे. आतापर्यंत एकूण १३६ अर्जांची विक्री झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
गट सदस्य संख्या दाखल झालेले अर्ज
१) कऱ्हाड गट : ३ ५
२) तळबीड गट : ३ २
३) उंब्रज गट : २ ०
४) कोपर्डे हवेली गट : २ ३
५) मसूर गट : ३ ५
६) वाठार किरोली गट : ३ ४
७) महिला राखीव : २ ०
८) अनुसूचित जाती/जमाती : १ २
९) भटक्या जाती/विमुक्त/ प्रवर्ग : १ ०
१०) इतर मागास प्रवर्ग : १ ०
एकूण सदस्य संख्या : २१, दाखल अर्ज २१