सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो : उंडाळकर

By admin | Published: October 30, 2016 01:03 AM2016-10-30T01:03:48+5:302016-10-30T01:04:26+5:30

उत्तरेत सक्षम नेतृत्त्व नाही : किवळ येथील कार्यक्रमात बाळासाहेब पाटलांवर कडाडून टीका

Sahyadri grows instead of sugarcane: | सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो : उंडाळकर

सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो : उंडाळकर

Next

मसूर : ‘एकाच घरात सत्तेचा घरोबा करून जनतेचे शोषण करणे हे लोकशाहीला घातक आहे. आमदारकी व सह्याद्रीची सत्ता हे कायम भोगत सामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्याचे राजकारण करीत सर्व सत्ताचे केंद्रीकरण करून यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विचाराला उत्तरेतील कर्तृत्वहीन नेतृत्व तिलांजली देत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो. उत्तरेत सक्षम नेतृत्व नाही.’ अशी टीका करून मसूर पूर्व भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले माजी मुख्यमंत्री आणि उत्तरेतील लोकप्रतिनिधींचा पराभव असल्याचा आरोप माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केला.
किवळ, ता. कऱ्हाड येथे मुंबई महानंदाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल वसंतराव जगदाळे यांचा व रयत कारखान्याच्या चेअरमनपदी उदयसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कस्टम अधिकारी मोहनराव साळुंखे होते. यावेळी कोयना दूध संघाचे अध्यक्ष डॉ. नाना यादव, उपाध्यक्ष बाबूराव धोकटे, कृष्णा कामगार संघटनेचे अध्यक्ष पै. आनंदराव मोहिते, आत्माराम जाधव, कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पतंगराव माने, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष अनिल मोहिते, संचालक रामकृष्ण वेताळ, धनाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, ‘सत्ता हे समाजसेवेच माध्यम आहे. तथापि उत्तरेतील लोकप्रतिनीधी आमदारकी व सह्याद्रीची सत्ता कायम भोगत आहेत. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेत संधी दिल्या; मात्र इथल्या नेतृत्वाने सक्षम कार्यकर्त्यांना मोडीत काढून सत्तेच घराभोवती कोंडाळ केले. ही सामाजिक विषमता लोकशाहीला घातक आहे. सह्याद्रीचे अध्यक्ष आयत्या पिठावरचे असून, त्यांनी जनतेचे शोषण करून किती प्रापर्टी जमवल्या? याचे उत्तर त्यांच्याकडे नसून त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत.
यावेळी पै. आनंदराव मोहिते, बबनराव साळुंखे यांची भाषणे झाली. सुरुवातीला गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)


.. लोकप्रतिनिधींचा पराभवच
‘उत्तरेत यशवंतराव चव्हाण यांचा विचार शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. विकासाचे धोरण व इच्छाशक्ती नसल्यानेच उत्तरेतील जनतेला पाणी नाही हा इथल्या लोकप्रतिनिधींचा पराभव आहे. रयत चालवायला दिला. स्लिपिंग पार्टनर म्हणणे हा बौद्धिक बालिशपणा असून, अशा कर्तृत्वहीन नेतृत्वाला बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी द्या. उत्तर-दक्षिणेतील एकाधिकारशाहीची राजवट सुज्ञ मतदारांनी उलथून टाकून परिवर्तनासाठी रयत सहकारच्या पाठीशी राहा,’ असे आवाहन विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.
वारसा हक्काने आयत्या सत्ता मिळाल्या : जगदाळे
वसंतराव जगदाळे म्हणाले, ‘दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला तिलांजली देऊन सत्तेचे केंद्रीकरण करणाऱ्या उत्तरेतील नेतृत्वाला वारसा हक्काने आयत्या सत्ता मिळाल्या. त्यांनी फ्लॅट व जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मसूर भागात कोणता शाश्वत विकास केला नाही. पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले. विलासराव पाटील यांनी तीन डोंगर फोडून पाणी आणले; पण इथल्या नेतृत्वाला धनगरवाडी-हणबरवाडी पाणी योजना झाली नाही. सह्याद्री हे राजकारणाचे व्यासपीठ करून ठेवले आहे.’

तर तालुका दुष्काळाच्या खाईत जाईल : माने
पतंगराव माने म्हणाले, ‘गेली ५० वर्षे एकाच घरात सत्ता असतानाही भिकूनाना किवळकर, बाबासाहेब चोरेकरांच्या भागाचे वाळवण का केले? सत्तेवर अजूनही उपरे नेतृत्व ठेवले तर तालुका दुष्काळाच्या खाईत जाईल. सह्याद्रीला काकांनीच वाचवले, अन्यथा तुम्ही सत्तेवर दिसला नसता. राष्ट्रवादीने लाचारी पत्करू नये. काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तरेतील काँग्रेस मातीमोल केली. धैर्यशील कदमांचा बळी दिला. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी रयत सहकारमध्ये सामील व्हावे, भविष्यात पंचायत समिती ही काकांच्या विचाराची असेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.

Web Title: Sahyadri grows instead of sugarcane:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.