सह्याद्रीच्या कुशीत वसलीय पाखरांची दुनिया !
By admin | Published: March 20, 2017 11:37 PM2017-03-20T23:37:21+5:302017-03-20T23:37:21+5:30
शेकडो प्रजातींचे हजारो पक्षी : कोयना, चांदोली अभयारण्यासह डोंगररांगांमध्ये वास्तव्य; पक्षी अभ्यासकांची निरीक्षणे
संजय पाटील ल्ल कऱ्हाड
आकाशात भिरभिरणारी पाखरं आपण रोज पाहतो; पण या पाखरांचं निरीक्षण करून त्याच्या नोंदी ठेवण्याची तसदी कुणीही घेत नाही. सध्या हेच काम काही पक्षी अभ्यासक आवडीनं करतायत. त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार कोयना व चांदोली अभयारण्यांसह सह्याद्रीच्या रांगांमध्ये शेकडो प्रजातींचे हजारो पक्षी वावरतायत. या निरीक्षणात काही दुर्मीळ तर काही पाहुणे पक्षीही नोंदले गेलेत. पक्षी अभ्यासकांच्या या नोंदी आता आंतरराष्ट्रीय पक्षी संवर्धन संस्था (आयबीसीएन) यांच्याकडे पाठविल्या जाणार आहेत.
पश्चिम घाटातील समृद्ध जंगल हे देशातील जैवविविधतेचे एक मोठे आश्रयस्थान असून, येथे पशु, पक्षी, वनस्पतींच्या अनेक प्रकारच्या स्थानिक प्रजाती आढळून येतात. पश्चिम घाटामध्ये सस्तन प्राण्यांच्या ४००, पक्ष्यांच्या २७५ व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ६० प्रजातींची यापूर्वीच नोंद झाली आहे. पश्चिम घाट पर्वतरांगांच्या याच अद्वितीय वैश्विक मूल्यांची जाणीव झाल्याने युनेस्कोने २०१२ मध्ये त्यांच्या निकषाप्रमाणे पश्चिम घाट जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रात पश्चिम घाट हा सह्याद्री पर्वत म्हणून ओळखला जातो. चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य या दोन्हींचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून समावेश झाला. त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ १०२६.२२ वर्ग किलोमीटर आहे.
कोयना अभयारण्य ही पश्चिम घाटाची उत्तरेकडील सरहद्द असून, येथील सदाहरित वनांमुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधिता आढळून येते. त्यातच येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे प्रकल्पासाठी पोषक वातावरण असून, येथे पर्यटनाच्यादृष्टीने नवनवीन उपाययोजना करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. येथील सदाहरित वने पक्ष्यांसाठी परवणी ठरताना दिसत आहेत. कोयना अभयारण्य, चांदोली तसेच सह्याद्रीच्या रांगा शेकडो प्रजातींमधील पक्ष्यांचे आश्रयस्थान बनल्या आहेत. या पक्ष्यांच्या निरीक्षणाचे व त्यांच्या नोंदी घेण्याचे काम सध्या काही पक्षी अभ्यासक करतायत. या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार येथे शेकडो प्रजातींचे हजारो पक्षी आहेत.
पश्चिम घाटामध्ये आजपर्यंत सुमारे पाचशे प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी सुमारे २७५ प्रजातींची नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली असल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे सांगतात. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या २८ जातींपैकी १३ जातीच्या पक्ष्यांची नोंद एकट्या सह्याद्री प्रकल्पात करण्यात आली आहे. त्यामध्ये वृक्ष कबुतर (नीलगिरी वुडपिजन), मलबारी पोपट, मलबारी चंडोल, राखी डोक्याचा बुलबूल, तांबुस सातभाई, पांढऱ्या पोटाचा नाचरा, नीलगिरी फुलटोचा, छोटा शिंजीर, किरमिजी शिंजीर, मलबारी धनेश, मलबारी मैना, करड्या छातीचे हरेल, मलबार वुड श्राईक या पक्ष्यांचा समावेश असल्याचे रोहन भाटे यांनी सांगितले.
राजधनेश देतोय समृद्धीचा संदेश...
संकटग्रस्तांच्या यादीत असलेला मोठा धनेश (राजधनेश) हा पक्षीही कोयना अभयारण्यात पाहायला मिळतो. हा पक्षी समृद्धीचे प्रतीक आहे. बहुतांश वनांतून हा पक्षी हद्दपार झाला आहे. काही ठिकाणीच त्याचे अस्तित्व आढळत असून, कोयना अभयारण्यातील त्याचा वावर अन्नसाखळी सुरक्षित व मजबूत असल्याचे प्रतीत करतो.
पक्षी निरीक्षणासाठीच्या योग्य जागा
कोयना व चांदोली अभयारण्यात सध्या अनेक पक्षी अभ्यासक निरीक्षणासाठी भेटी देत आहेत. मात्र, निरीक्षणासाठीची योग्य जागा माहीत नसल्याने त्यांना नोंदी घेता येत नाहीत. मानद वन्यजीव रक्षक व पक्षी अभ्यासक रोहन भाटे यांच्या म्हणण्यानुसार, चांदोली राष्ट्रीय उद्यानात राम नदीचा निरीक्षण मनोरा, झोळंबी येथील करंबळी परिसर, कोयना येथील नवजा धबधबा परिसर व रामबाण परिसर पक्षी निरीक्षणासाठी चांगले आहेत.
पर्यटकांसाठी वासोटा ठरतोय पर्वणी...
कोयना अभयारण्यात पक्षी किंवा प्राणी निरीक्षण करणे सोपे नाही. जंगलाची घनता दाट आहे. जलाशयाच्या पलीकडे जाण्यासाठी सहज परवानगी मिळत नाही. तो परिसर सह्याद्री प्रकल्पाचा कोअर झोन आहे. मात्र, उत्तरेकडील वासोटा परिसरात पर्यटकांना फिरण्यासाठी तसेच निरीक्षणासाठी रितसर परवानगी मिळते. त्या भागात चांगले निरीक्षण करता येते, असे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.
शिकारी पक्ष्यांचा
वावर अधोरेखित
तुरेवाले सर्पगरूड, व्याध, पांढऱ्या डोळ्याचा बाज हे शिकारी पक्षी आहेत. तांबट, सुतारपक्षी, धोबी, बुलबूल, खंड्या, धनेश, रातवा, पोपट, घुबडांच्या सहा ते प्रजाती असे असंख्य पक्षी कोयनेत पाहायला मिळतात.
देहरादूनचा अभ्यासकही करतोय नोंदी
सह्याद्री प्रकल्पात वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचे प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांच्यामार्फत पक्षी अभ्यासक अशुतोष हे पक्ष्यांच्या नोंदीवरती नव्याने अभ्यास करीत आहेत. त्यांनी आपली पक्षी निरीक्षणे नोंदविली आहेत. तसेच यापूर्वी नोंदल्या गेलेल्या पक्ष्यांचे सध्याचे वास्तव्यही ते तपासतायत.