हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:48 PM2019-04-03T22:48:24+5:302019-04-03T22:48:30+5:30

दीपक शिंदे वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ...

Sahyadri ran for the protection of the Himalayas | हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

googlenewsNext

दीपक शिंदे
वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले क्रांतिवीर किसन वीर यांनी आपला मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी सोडला. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते; पण चीन आणि पाकिस्तान युद्धामुळे देशाला एका भक्कम संरक्षणमंत्र्यांची गरज होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला, अशा प्रकारचे कौतुकही झाले; पण १९६७ मध्ये त्यांना पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी मतदारसंघ नव्हता.
राज्यात पुन्हा थांबणे योग्य नव्हते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी नाशिकमधून लढण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत किसन वीर यांना कळाल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना सातारा मतदार संघातूनच उभे राहण्यासाठी विनंती केली. त्यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी किसन वीर यांनी स्वत:वर घेतली. त्यामुळे १९६७ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून यशवंतराव चव्हाण निवडून आले. त्यावेळी कºहाडमधून आनंदराव चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढत होते. त्यांना अडचण निर्माण करण्याची यशवंतराव चव्हाण यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अखेर सातारा मतदार संघातूनच निवडणूक लढविली आणि सुमारे १ लाख २७ हजार ८३६ मतांनी जिंकली.
यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ नंतर १९७१, १९७७, १९८० असे चार वेळा सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यामुळे देशात सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात संरक्षणमंत्री, अर्थ व नियोजन, गृहमंत्री त्याबरोबरच परराष्ट्रमंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली. यशवंतराव चव्हाणांनी राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही गोष्टी अत्यंत जबाबदारीने सांभाळल्या. सहकार आणि कृषी यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. राज्य आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, ही या मतदारसंघ आणि सातारकरांच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब आहे.

Web Title: Sahyadri ran for the protection of the Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.