सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 04:14 PM2023-04-12T16:14:59+5:302023-04-12T16:33:25+5:30

मागील तीन वर्षात क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे प्रकल्पाने व्हेरी गुड श्रेणीमध्ये स्थान मिळवले

Sahyadri Tiger Reserve ranks Very Good | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर

googlenewsNext

सातारा : आययूसीएन जागतिक संस्थेच्या मानकानुसार देशातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाचे चार वर्षातून एकदा मूल्यांकन होते. या अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कामगिरी उंचावली असून प्रकल्पाची नोंद 'खूप चांगले' श्रेणीत झाली आहे.

२०१८ च्या मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ६०.१६ टक्के मार्क मिळवून ३७ व्या क्रमांकावर होता. मागील तीन वर्षात क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे प्रकल्पाने व्हेरी गुड श्रेणीमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच ५१ व्याघ्र प्रकल्पामध्ये ३७ व्या स्थानावरून २७ व्या स्थानावर प्रगती केली आहे. सद्य:स्थितीत रहिवासी वाघांची संख्या नसली तरी दक्षिणेकडून स्थलांतरित वाघ ये-जा करीत असतात. रानकुत्री, बिबटे, अस्वल इ. या शिकारी प्राणी व गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर इ. या भक्ष्य प्राणांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना २०१० मध्ये झाल्यापासून २०१०,२०१४,२०१८ मध्ये प्रकल्पाने "फेअर व गुड" या श्रेण्या मिळविल्या होत्या. या वर्षीच्या अहवालात आतापर्यंत प्रथमच "खूप चांगले " श्रेणी मिळाली आहे. याच श्रेणीत देशातील २० व्याघ्र प्रकल्प असून याच श्रेणीत ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, काझिरंगा, कॉर्बेट, सुंदरबन, पन्ना, बांधवगढ या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. दि.९ एप्रिल रोजी म्हैसूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते "व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षे " या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी २०२२ वर्षातील प्रगणनेनुसार वाघांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार सद्य:स्थितीत भारतात ३,१६७ वाघांची नोंद करण्यात आली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने केलेले काही परिणामकारक व्यवस्थापन कामे

तृणभक्षी प्राणी विकास कार्यक्रम अंतर्गत व्याघ्र प्रकल्पात चितळांचे यशस्वी स्थानांतरण केले. भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून वाघांच्या स्थानांतरनाचा प्रस्ताव शासनास सादर, वनसंरक्षनाच्या दृष्टीने संरक्षणकुटी, निरीक्षण मनोरे, वायरलेस अद्यावत केले आहेत. व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर क्षेत्रामधील २०० किमी पेक्षा जास्त संरक्षण रस्त्यांची निर्मिती तसेच डागडूजी केली आहे. वन्यजीव अधिवास विकास कार्यक्रम अंतर्गत अखाद्य वनस्पतीचे निर्मूलन करून ५ हजार हेक्टर वरती गवत कुरणांचे व्यवस्थापन केले आहे. वन गुन्ह्यावर नियंत्रण आणले. बफर क्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे जंगल हे सह्याद्रीतील उर्वरित घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करते. बारा नद्यांचा उगम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून होत आहे. जल सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्पाच्या व तेथील लोकांच्या विकासामध्ये सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. - यू. एस. सावंत, उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कऱ्हाड

Web Title: Sahyadri Tiger Reserve ranks Very Good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.