‘सह्याद्री’ला दोन दिवसांचा ‘अल्टीमेटम’
By admin | Published: December 15, 2015 09:35 PM2015-12-15T21:35:51+5:302015-12-15T23:38:10+5:30
‘स्वाभिमानी’ आक्रमक : ९९ रुपयांच्या ऊसबिलासाठी निवेदन; आंदोलनाचा इशारा
कऱ्हाड : सह्याद्री साखर कारखान्याच्या थकीत ९९ रुपयांच्या बिलांचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडून ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर होत नसल्याने याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ‘सह्याद्री’च्या कार्यकारी संचालकांना निवेदन देत दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.यावेळी स्वाभिमानीचे कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, दक्षिणचे अध्यक्ष देवानंद पाटील यांच्यासह प्रदीप मोहिते, रामचंद्र चव्हाण, भरत चव्हाण, शैलेश चव्हाण, बाळासाहेब पिसाळ, संदीप मदने, संदीप पवार, दादासो यादव, शशिकांत शिवदास, बापूसो साळुंखे, सनी नलवडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक सी. एन. आहिरे यांच्याशी चर्चा केली व ऊसबिलाच्या मागणीसंदर्भात निवेदन दिले. यावेळी आहिरे यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सह्याद्री साखर कारखान्यानं गळीत हंगाम सन २०१३-१४ मध्ये गाळप केलेल्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या ऊस दरासाठी २ हजार ५१९ रुपये प्रतिटन हा अंतिम दर जाहीर केला होता. या जाहीर केलेल्या ऊस दरापैकी आपल्या कारखान्याने आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ४२० रुपये प्रतिटन या प्रमाणे रक्कम दिलेली आहे. आपल्या कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिटन ९९ रुपये येणे बाकी आहेत. गाळप हंगाम अद्याप ही शेतकऱ्यांना येणे बाकी असलेली प्रतिटन ९९ रुपये ही रक्कम मिळालेली नाही. सद्याची दुष्काळी परिस्थिती पाहता व उसाचे घटलेले उत्पादन पाहता ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तरी ही ऊस दराची येणे बाकी असलेली रक्कम शेतकऱ्यांना या परिस्थितीत मिळणे गरजेचे आहे. म्हणून २०१३-१४ मधील ऊस गाळप करण्यास दिलेल्या शेतकऱ्यांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील देय असलेली ९९ रुपये प्रतिटन ऊस बिल व्याजासह दोन दिवसांच्या आत देण्यात यावी. तसेच २०१५-१६ मध्ये शासनाने ठरवल्या प्रमाणे येत्या गळीत हंगामात ‘एफआरपी’ प्रमाणे होणाऱ्या रक्कमेतील ८० टक्के रक्कम ही पहिला हप्ता अॅडव्हास म्हणून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी,’ अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल. (प्रतिनिधी)