म्हणे... दादा दहा रुपयांचा ठोकळा बंद झाला
By Admin | Published: May 28, 2017 02:26 PM2017-05-28T14:26:04+5:302017-05-28T14:30:55+5:30
अफवांचं पिक : रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणानंतरही तरडगावच्या बाजारातून नाणे हद्दपारीच्या मार्गावर
आॅनलाईन लोकमत
तरडगाव : ह्दादा... दहा रुपयाचा ठोकळा बंद झाला ठाऊक नाय व्हय.. दुसरी नोट द्या, असा संवाद तरडगाव परिसरातील आठवडा बाजारांतून ऐकायला मिळत आहे. दहा रुपयांची नाणी वागवणे अवघड जात असल्याने काही व्यापाऱ्यांकडून हेतू पुरस्करपणे अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दहा रुपयांची नाणी बंद होणार या अफवांमुळे सर्वसामान्यामध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. जवळील पाच, दहा रुपयांची नाणी जमा करण्यासाठी नागरिकांनी चक्क बँकांकडे धाव घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान अधिकृत चलन नाकारणे हा गुन्हा असून तसे आढळल्यास आखील भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला गेल्याने दिलासा मिळाला असला तरी जवळ दहा रुपयांचे नाणे बाळगणे जिकिरीचे बनत असल्याचे दैनंदिन वेगवेगळ्या होणाऱ्या घडामोडीतून भासत आहे.
नागरिक व काही व्यापारीही नोटबंदीच्या काळाप्रमाणे उगाचच भविष्यात बँकेत रांगा लावण्याची वेळ येऊ नये या भीतीपोटी दहा रुपयाचे नाणे दिसले की हात झटकत आहे. आठवडा बाजारातही काही विक्रेते अशी नाणी स्वीकारत नसल्याने बाजारकरूची गैरसोय होते. एरव्ही पिग्मी एजंटांकडून सुटे पैसे घेणारे व्यापारी आता एजंट दैनंदिनी रक्कम नेण्यासाठी दुकानात आला की त्याच्या हातावर सुटे पैसे ठेवताना दिसत आहेत. नाणे बंदीच्या अफवेमुळे दहा रुपयाचे नाणे जवळ बाळगण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसत आहे.
रोजच्या नाण्याच्या संदर्भात होणाऱ्या घडामोडीमुळे शेवटी नागरिकांनी पाच, दहा रुपयांची नाणी आता थेट बॅँकेतच भरण्याचा पर्याय निवडल्याचे सद्य:स्थितीवरून समजते. त्यानुसार ही मंडळी आता बचत म्हणून ठेवलेली ही नाणी जमा करण्यासाठी बँकेकडे धाव घेऊ लागली आहेत.
याचा प्रत्यय नुकताच महाराष्ट्र बँकेच्या तरडगाव येथील शाखेत आला. घरात बचत म्हणून जमा करून ठेवलेली पाच व दहा रुपयांची नाणी बॅँकेत भरण्यासाठी आणणारी वृद्ध व्यक्ती संबंधित नाणी बॅँकेतच मोजत असल्याचे पाहून अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत उपस्थितांमधून उलटसुलट चर्चा सुरू झाली. इतर दोन व्यक्तींनी त्या वृद्ध व्यक्तिकडून पाच रुपयांची काही सुटी नाणी घेऊन त्या बदल्यात नोटा देवून वृद्धाकडील चलनातील नाण्यांचा भार कमी केला.
नाणी न स्वीकारणे गुन्हा असून ती सर्वांनी दैनंदिन व्यवहारात वापरावीत असे आवाहन केले जाते. तरीही अफवांमुळे ती आता बँकेत येण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकाकडून स्वीकारल्यावर बँक कॅशिअर ती मोजताना खूप वेळ जात आहे. यामुळे इतर ग्राहकांना ताठखळत थांबावे लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होतो. यासाठी सद्यस्थितीत दहा रुपयांच्या नाण्याचं चलन सर्वांनी स्वीकारून व्यवहारात खेळत रहाणं हे सर्वांसाठी फायद्याचं ठरेल