हक्काच्या पेन्शनसाठी ५० वर्षांपासून सैनिकाचा लढा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:56 PM2017-09-18T23:56:35+5:302017-09-18T23:56:38+5:30
अजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : ‘नटसम्राट’मधील ‘कुणी घर देता का घर..’ हा नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांचा प्रसिद्ध संवाद आजही ऐकला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यातील प्रत्येक शब्दन्शब्द चटका देऊन जातो; पण हाच संवाद तंतोतंत लागू होतोय एका माजी सैनिकासाठी. मरळीतील या वयोवृद्ध माजी सैनिकावर ‘कुणी पेन्शन मंजूर करून देता का रे पेन्शन..,’अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तीही गेल्या पन्नास वर्षांपासून.
भारत-पाक युद्धात एक बोट गमावलेला हा सैनिक आता थकलाय. ते ही म्हणतायत, ‘तुफान आता थकून गेलंय, झाडाझुडपात, डोंगरदºयात अर्ध अधिक तुटून गेलंय, समुद्राच्या लाटांवरती, वनव्याच्या जाळावरती, झुंज, झेप घेऊन-घेऊन तुफान आता थकलंय. जळके-तुटके पंख पालवीत, खुरडत-खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो तुफानाला तुफानपणच नडतंय रे.’
े संवाद आहेत. वार्धक्याकडे झुकलेल्या हणमंतराव श्रीपती पाटील या माजी सैनिकाचे.
कºहाड तालुक्यातील मरळी गावचे हे सुपुत्र. १९६२ मध्ये भारतीय सैन्यदलाच्या आटलरी तोफखाना विभागात ते भरती झाले. १९६५ मध्ये भारत-पाक युद्धात ते सीमेवर होते. या लढाई काळात अपघाताने त्यांच्या हाताच्या बोटाला जखम झाली. जखम चिघळत गेली आणि बोट काढावे लागले. या नंतर ते सक्तीने सैन्यदलातून घरी आले आणि यानंतर गेली ५० वर्षांपासून त्यांचा पेन्शन मिळविण्याबाबतचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.
पेन्शन मिळण्याबाबत त्यांनी या ५० वर्षांच्या काळात शेकडो पत्रे, पुराव्यांच्या कागदपत्रांच्यासह विविध ठिकाणी पाठविली आहेत. त्यांनी ही पत्रे पंतप्रधान, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सैन्यदलाचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, नाशिकचे रेकॉर्ड रुमचे अधिकारी, सोल्जर बोर्ड यांना लिहिली आहेत. मागणी अर्ज केले आहेत. या सर्वांच्या पोहोचही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यातील अनेकांनी त्यांना माघारी पाठवलेली पत्रेही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
लालफितीच्या
कारभाराबद्दल खंत...
माजी सैनिक हणमंतराव पाटील सांगतात की, मला कोणीही पेन्शन नाकारली नाही. पण गेली पन्नास वर्षे प्रत्येक जण आपल्यावरील जबाबदारी झटकून दुसºया विभागाकडे बोट दाखवित आहे. या लालफितीच्या कारभारात मी भरडतोय. आयुष्याच्या संध्याकाळी हे पाटील दाम्पत्य पोटाची दोन वेळची खळगी भरण्यासाठी धडपडत आहे. जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. माझी दोन्ही मुले रोजी-रोटीसाठी परगावी गेली आहेत.