सय्यद कुटुंबात देवी भक्तीचा सुवर्ण महोत्सवी जागर!

By admin | Published: October 18, 2015 09:50 PM2015-10-18T21:50:55+5:302015-10-18T23:56:27+5:30

खटाव तालुक्यात सर्वधर्म समभावाचा आदर्श : मुस्लिम समाजातील तिसऱ्या पिढीकडून नवरात्रोत्सवाच्या पावित्र्याचे पालन

Saiyad family felicitation of the Golden Jubilee of Goddess! | सय्यद कुटुंबात देवी भक्तीचा सुवर्ण महोत्सवी जागर!

सय्यद कुटुंबात देवी भक्तीचा सुवर्ण महोत्सवी जागर!

Next

नम्रता भोसले-- खटावपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खातगुण गावात सय्यद नामक मुस्लिम कुटुंबात ‘देवीच्या भक्तीचा जागर’ यंदा सुवर्ण महोत्सवी ठरला आहे. या कुटुंबात दरवर्षी नवरात्रोत्सावात दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या परंपरेला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच या काळात नऊ दिवसांची उपासना करण्याचे कार्यही मोठ्या भक्तिभावाने तिसरी पिढी करत आहे.
खटाव तालुक्यातील खातगुणमध्ये पै. अहंमद रसूल सय्यद (मामू) यांनी सुरू केलेल्या या एकतेला आता पन्नास वर्षांची झालर लागली आहे. मामू यांनी १९६५ सालापासून मुस्लिम तसेच अपंग असूनही त्या काळच्या कर्मठवादी समाजाचा प्रसंगी त्रास सहन करूनही हिंदूचे सण साजरे करण्याचा निर्णय घेतला. तो आजही सुरूच आहे.
त्यांनी घरीच दत्तजयंती, दुर्गामातेचा उत्सव सुरू केला. केवळ देवीवरील भक्ती व श्रद्धेच्या जोरावर त्यांनी हे दोन उत्सव सुरू केले. या उत्सवकाळात ते नित्यनियमाने ‘काकड आरती’ करत असत. तसेच सकाळ-सायंकाळी देवीची आरती केली जायची. २००६ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतरही पुढच्या पिढीनेही हीच परंपरा भक्तिभावाने आतापर्यंत कायम ठेवली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे पुतणे शब्बीर बाबालाल सय्यद तसेच त्यांच्या पत्नी शबाना आजही वारसा तसाच जपत आहेत. छोटसं सायकल दुरुस्तीचे दुकान सांभाळत त्यांनी हा धार्मिक वसा अत्यंत श्रद्धेने जोपासला आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत असते.
दरम्यान, या नवरात्रोत्सवाच्या काळात देवीचे नऊ दिवसांचे उपवास या दोघा पती-पत्नीकडून धरले जातातच, त्याचबरोबर संपूर्ण उत्सवकाळात काकड आरती पासून सुरुवात होऊन रात्री जागरपर्यंत सर्व धार्मिक विधी नित्यनियमाने केले जातात.
तसेच देवीचे महात्म्य स्वत: शब्बीर हे वाचतात. तर सकाळ-सायंकाळची आरती ही शब्बीर तसेच त्यांची मुले म्हणतात. खातगुणमधील सर्व महिला व ग्रामस्थ भक्तीने रोज दर्शनासाठी येतात. तर महिला वर्ग भक्तीने देवीस साडी तसेच ओटीचे सामान घेऊन पूजा करण्यासाठी येतात. दरवर्षी असाच हा कार्यक्रम सुरू असतो.दरम्यान, या मूर्तीचे प्रत्येक वर्षी विसर्जन केले जाते. या मूर्तीची विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण खातगुण गावातील सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात. (प्रतिनिधी)


दहीभाताचा नैवेद्य...
सय्यद यांच्या घरातील अत्यंत सौम्य व शांत असा मुखवटा धारण केलेली देवी आजही खातगुणसह पंचके्राशीत नवसाला पावणारी म्हणून मानली जाते. बऱ्याच ठिकाणी देवी उठवताना मांसाहारचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आजही रुढ आहे; परंतु या उलट या दिवशी खातगुणमध्ये दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो.

खातगुणमध्ये माझ्या चुलत्यांनी ही प्रथा सुरू केली. त्यावेळीचा काळ व समाज अतिशय कडक होता, तरीही त्यांनी त्यांना न जुमानता खातगुणमध्ये घरी देवी बसवण्याची पद्धत सुरू केली. सुरुवातीला लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कालानरूप याचे स्वरूप बदलत गेले. आज मोठी मूर्ती बसवली जात आहे.
- शब्बीर सय्यद

Web Title: Saiyad family felicitation of the Golden Jubilee of Goddess!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.