तळी भरमसाठ; अडथळे सतराशे साठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:47 PM2018-08-19T23:47:17+5:302018-08-19T23:47:21+5:30
सातारा : गणेशोत्सवाच्या तोंडावरच विसर्जन तळ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पालिका प्रशासनापुढे यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पोलीस प्रमुखांनी ऐतिहासिक रिसालदार तलावाची परवानगी नाकारल्याने तळ्याचा तिढा आणखीनच वाढला आहे. उत्सवाला कमी दिवस राहिल्याने ‘तळी भरमसाठ अन् अडचणी सतराशे साठ’ अशीच अवस्था सध्या पालिकेची झाली आहे. त्यामुळे गणेश मूर्तींचे विसर्जन करायचे कुुठे? असा प्रश्न गणेशमंडळांना सतावू लागला आहे.
पालिकेच्या वतीने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या जागेत कृत्रिम तळ्याची उभारणी केली जात होती. यात तळ्यात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. यंदा जिल्हा परिषदेने कृत्रिम तळ्यासाठी जागा देण्यास मनाई केली. त्यामुळे पालिकेकडून पुन्हा नव्याने मूर्ती विसर्जनासाठी तळ्याची चाचपणी सुरू झाली. पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या ऐतिहासिक रिसालदार तलावाची निवडही करण्यात आली. मात्र, पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी तलावात विसर्जनाची परवानगी नाकरल्याने पालिकेची धावाधाव सुरू झाली आहे.
सातारा शहरात पूर्वीपासून मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. जलप्रदूषण व अन्य कारणांमुळे कालांतराने या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली. त्यामुळे पालिकेकडून गोडोली, सदर बझार, हुतात्मा स्मारक, जलतरण तलाव व प्रतापसिंह शेती फार्म हाऊस येथील कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. परंतु प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या जागेवर तळे उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने बंदी घातल्याने पालिकेची धांदल उडाली आहे.
ऐतिहासिक मंगळवार तळ्यात घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मोती तळेही सध्या बंद अवस्थेत आहे. फुटका तलावातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. तसेच कृत्रिम तळेही यंदा खोदण्यात येणार नसल्याने सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन नक्की करायचे कुुठे? असा प्रश्न गणेश मंडळांपुढे उभा राहिला आहे.
सातारा शहरात अनेक ऐतिहासिक तळी आहेत. मात्र, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी बंद घालण्यात आल्याने पालिकेपुढे विसर्जन नक्की करायचे कोठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेकडून रिसालदार तलावाची पाहणीही करण्यात आली. परंतु शहरातील सर्वात ऐतिहासिक असा हा तलाव आहे. या तलावात यापूर्वी कधीही मूर्तीचे विसर्जन झाले नाही.
तशी कोणतीच व्यवस्था या ठिकाणी नाही, असा निर्वाळा देत नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या तलावातही मूर्ती विसर्जन करू नये, असे पालिकेला सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे.
गणेशोत्सवाला अवघे तेवीस दिवस उरल्याने सध्या तरी नव्या कृत्रिम तळ्यासाठी जागेची पाहणी करणे, तळ्याचे खोदकाम करणे अन् यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च पालिकेला न परवडणारा असाच आहे. पोलीस अधीक्षकांनी रिसालदार तलावाची परवानगी नाकारल्याने पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली आहे. या दृष्टीने सोमवार, दि. २० रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या बैठकीत योग्य तोडगा न निघल्यास मूर्ती विसर्जनाचा प्रश्न बिकट होणार आहे.
... गोडोली तळे ठरू शकतो पर्याय
शहरातील गोडोली तळ्यातही पालिकेच्या वतीने दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. सध्या या तळ्यात मुबलक पाणीसाठा आहे. मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्ती व दुर्गादेवींचे विसर्जन करण्यासाठी पालिकेला हा तळे पर्याय ठरू शकतो. मात्र, प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेणे, मूर्ती विसर्जनानंतर गाळ काढणे, सीसीटीव्ही कॅमेरे, क्रेन आदींसाठी पालिकेला निधीची तरतूूद करावी लागणार आहे. गोडोली तळ्याचा पर्याय जरी पालिकेपुढे असला तरी हे तळे शहरापासून लांब असल्याने तसेच ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने मिरवणूक मार्गाची अडचण निर्माण होऊ शकते. मात्र, पालिका व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून वाहतूक नियोजन केल्यास हा प्रश्नही मार्गी लागू शकतो, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.