सख्खे शेजारी... पक्के लय भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:44+5:302021-04-11T04:37:44+5:30

पहिल्या मजल्यावर राहणारे शांताराम आणि त्यांची बायको दोघेही काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सर्दी, खोकला अशी किरकोळ लक्षणे ...

Sakhe Shejari ... Pakke Lay Bhari! | सख्खे शेजारी... पक्के लय भारी!

सख्खे शेजारी... पक्के लय भारी!

Next

पहिल्या मजल्यावर राहणारे शांताराम आणि त्यांची बायको दोघेही काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सर्दी, खोकला अशी किरकोळ लक्षणे त्यांना होती. या परिस्थितीमध्ये दोन मुले आणि नवरा-बायको वन बीएचके फ्लॅटमध्ये एकत्रित राहणार होते. मुलांना कोणती लक्षणे नव्हती; मग आता या पती-पत्नीकडून मुलांना संसर्ग होणार हे लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या काकांनी लगेच निर्णय घेतला. स्वतःची कार काढून त्यांनी मुलांना त्यांच्या काकांकडे सोडले. आता घरामध्ये दोघेच राहिले होते. सिविलमध्ये टेस्ट केली; मात्र औषधे मिळाली नव्हती. केवळ टेस्ट केल्यानंतर १४ दिवस घरात बसून राहायचं.. बाहेर रस्त्यावर यायचं नाही, असा अगतिक सल्ला देण्यात आला होता. मात्र औषधे न घेता कोरोनामुक्त कसे व्हायचे? हा प्रश्न शांताराम आणि त्यांच्या पत्नीला पडला होता. त्याच वेळी सख्खे शेजारी धावून आले.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींशी कोणीही संपर्क साधत नाही. उलट काही आगंतुक घडल्याच्या आविर्भावात लोक त्यांच्याशी वागत राहतात. मात्र त्याच्या उलटे चित्र या अपार्टमेंटमध्ये होते. फॅमिली डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे शेजाऱ्यांनी घरपोच केली; तर फळे, भाज्या ह्यादेखील वस्तू न सांगता आणून दिल्या. घरातील कचरा टाकायचा होता. हा प्रश्नदेखील शेजाऱ्यांनी सोडवला. तुम्ही रात्री डसबिन बाहेर ठेवा, आम्ही कचरा टाकतो, असे त्यांनी सांगितले. रोज घंटागाडी दारात आली की शेजारचे तो कचरा घंटागाडीत टाकत होते. १४ दिवस बिनबोभाट आणि विनातक्रार हे काम सुरू होते.

अगदी जवळचे नातेवाईक जशी काळजी घेतात, त्याच पद्धतीने शेजाऱ्यांनी आपली काळजी घेतली. आपल्याला झालेले दुःख त्यांना वेदना देऊन गेलं. आपण खचून जाणार हे लक्षात आल्यावर त्यांनी धीर दिला. “काही होत नाही लवकर बरे व्हाल... “गेट वेल सून,” असं म्हणत त्यांनी जगण्याचं बळ दिलं. शेजाऱ्यांच्या या आपुलकीच्या वागण्यामुळे शांताराम आणि त्यांची पत्नी भारावून गेले आहेत! या सकारात्मक वातावरणामुळे ते दोघेही लवकरच कोरोनाशी दोन हात करून बरेदेखील झाले.

पैशांचं राहू द्या हो! बरे झाले की पार्टी करू...

औषधं, भाज्या-फळे यासाठी शेजारीच पैसे खर्च करत होते. पैशाचं विचारलं तर राहू द्या.. ते नंतर बघू.. तुम्ही बरे झाला की छान पार्टी करू! असं म्हणणाऱ्या शेजाऱ्यांनी बरे झाल्यानंतरदेखील पार्टीचं नाव काढले नाही आणि पैसे देण्याचा प्रयत्न केला तर तेदेखील घेतले नाहीत.

- सागर गुजर

Web Title: Sakhe Shejari ... Pakke Lay Bhari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.