‘सखीज गॉट टॅलेंट’ स्पर्धा उत्साहात
By admin | Published: May 7, 2016 12:05 AM2016-05-07T00:05:09+5:302016-05-07T00:51:22+5:30
कलर्स व सखी मंच प्रस्तुत स्पर्धा : सखींनी लुटली बक्षिसांची मेजवानी
सातारा : डोलायला लावणारे नृत्याविष्कार, सुमधूर गाण्याचे बोल, व्हायोलिनची सुरावट, काटवट कण्याचा अविष्कार, अभिनयाची जुगलबंदी सोबत बक्षिसे आणि मनोरंजनाची लयलूट अशा उत्साही वातावरणात महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. निमित्त होते कलर्स वाहिनी आणि लोकमत सखी मंच आयोजित सखीज गॉट टॅलेंटचे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह येथे गुरुवार, दि. ५ मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कलर्स वाहिनीवर येत्या ३० एप्रिलपासून रात्री ९ वाजता दर शनिवार-रविवारी इंडियाज गॉट टॅलेंट हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. पुन्हा एकदा कलाकारांच्या अंगभूत कलेला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियाज गॉट टॅलेंट हा मंच सच्च्या कलाकारांना उपलब्ध करून दिला आहे. ‘सिर्फ हुनर ही है पहचान’ या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन होणार
आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर , दूरदृष्टी असलेले ख्यातनाम निर्देशक करण जोहर, नृत्यनिपूण मलाईका अरोरा, यांच्या अनुभवी परीक्षणातून सर्व कलाकार तावून सुलाखून बाहेर पडणार आहेत. यानिमित्ताने सखींसाठी यावेळी सखीज गॉट टॅलेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षिका माया मोहिते, अमर अग्रवाल, अजित साळुंखे, अरविंद मोटे, सलमान सय्यद, विशाल इंगवले, सागर लोहार, ओमकार भंडारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून
कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात
आले.
नृत्य, गायन व इतर कलागुण या तीन गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेची रंगत व चुरस उत्तरोत्तर वाढतच गेली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संतोष पाटील, वैशाली राजेघाटगे व सतीश आडेकर यांनी काम पाहिले. विजेत्यांना परीक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. उपस्थित सखींमधून सुशांता घाटगे या भाग्यवान सखीला पैठणी व सविता फाळके यांना सुवर्ण नथ देण्यात आली. वृषाली शिंदे-खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण..
कार्यक्रमात कारी येथील मल्लखांब ग्रुपच्या खेळाडूंनी चित्तथरारक अशी योगासनांची व मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये दोरीवरील मल्लखांब, जलदीप मल्लखांब, निराधार मल्लखांब असे नजर खिळवून टाकणारे प्रकार दाखविण्यात आले. ‘गंधतारा ढोल्स्’च्या ग्रुपमधील मुलींनी अप्रतिम असे ढोल वादन सादर केले. छावा ग्रुपने ही दांडपट्ट्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. तसेच कलाधाम ग्रुप आणि दुर्गेशनंदिनी यांनीही ग्रुप बहरदार असा ग्रुप डान्स सादर केला. सरगम पॅलेसचे अरविंद मोटे आणि त्यांच्या सहकलाकारांनी गायलेल्या गाण्यांना सखींनी दिलखुलास दाद दिली.