पगार दीड महिन्यानंतरही वेळेवर न मिळाल्याने एस. टी. कामगारांची कडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:42 AM2021-08-19T04:42:48+5:302021-08-19T04:42:48+5:30
सातारा : राज्य परिवहन महामंडळ जेवढे प्रवाशांमुळे सुरू आहे, तेवढाच हा डोलारा यशस्वीपणे सांभाळण्याचे इंद्रधनुष्य कामगार सांभाळत असतात. त्यामुळे ...
सातारा : राज्य परिवहन महामंडळ जेवढे प्रवाशांमुळे सुरू आहे, तेवढाच हा डोलारा यशस्वीपणे सांभाळण्याचे इंद्रधनुष्य कामगार सांभाळत असतात. त्यामुळे एस. टी.ला चांगले दिवस आले. मात्र, कोरोनाची नजर लागली अन् वाईट दिवस आले. जिल्ह्यातील हजारो कामगारांचा दीड महिन्यानंतरही पगार झालेला नाही, त्यामुळे खिशात कडकी जाणवत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एस. टी. सहा ते सात महिने बंद होती. त्यावेळी कामगारांचा पगार दिवाळीत झाला होता. दररोजचा खर्च भागविणेही अवघड जात असल्याने एस. टी.चे अनेक कर्मचारी फळे, भाज्या विकत होते. तीच वेळ पुन्हा या कामगारांच्या कुटुंबांवर आली आहे. दरवेळी दीड महिना झाला तरी पगार होत नाही. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न एस. टी.च्या हजारो कामगारांना सतावत आहे.
(कोट)
उसनवारी तरी किती करायची
अनेकांचे आई-वडील, मुलं आजारी आहेत. कोणाच्या मुलांचे लग्न आहे. मात्र पगारच नसल्याने अडचण येते. कित्येकवेळा मित्र, नातेवाईकांकडून उसनवारी केली जाते; पण किती दिवस उसनवारी करायची, हे समजत नाही.
- सागर शिंदे, कर्मचारी
एक येणार आहे...
चौकट
एस. टी. बरोबरच कामगारांचे उत्पन्न कमी खर्च जास्त
- राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱ्या कोरोनानंतर कमी झाल्या आहेत. रुग्णसंख्या वाढली की नागरिकांचा प्रवास थांबतो. त्यामुळे उत्पन्न म्हणावे त्या प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे एस. टी.चा गाडा चालवताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
- याउलट डिझेलही शंभर रुपयांच्या घरात पोहोचले आहे. दरम्यानच्या काळात मर्यादीत प्रवासी वाहतूक करण्यास सांगितले जात होते. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकणात महापूर, भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना संसार पुन्हा उभा करायचा आहे. या भागातील कामगारांना तरी पगार मिळायला हवा. एस. टी. कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हणमंत ताटे यांनी नुकतीच यासंदर्भात परिवहन मंत्र्यांची भेट घेतली आहे.
- ज्ञानेश्वर ढोमे, एस. टी. कामगार संघटना, सातारा