भररस्त्यात गांजाची विक्री; दोघांना अटक
By संजय पाटील | Updated: December 24, 2023 18:05 IST2023-12-24T18:04:53+5:302023-12-24T18:05:11+5:30
कऱ्हाडात कारवाई : गुन्हे शाखेने टाकला छापा; सव्वा किलो गांजा जप्त

भररस्त्यात गांजाची विक्री; दोघांना अटक
कऱ्हाड : भररस्त्यात खुलेआमपणे गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्चनजीक रविवारी ही कारवाई केली.
पवन सुभाष डावरे (वय १८, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) व यासर कादर शिकलगार (वय २०, रा. विश्रामनगर, मलकापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्चनजीक दोघेजण गांजाची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख उपनिरीक्षक राजू डांगे यांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांच्यासह अझहर शेख, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, हवालदार शशी काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे यांनी तातडीने त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पवन डावरे आणि यासर शिकलगार हे दोघेजण गांजा विकताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अंमली पदार्थविरोधी कारवाई यापुढे सुरूच राहणार असून ती अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे.