पानपट्टी बंद करून सुरू केली भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:13+5:302021-04-18T04:38:13+5:30

माणिक डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये ...

The sale of vegetables started by closing the leaf strip | पानपट्टी बंद करून सुरू केली भाजीपाला विक्री

पानपट्टी बंद करून सुरू केली भाजीपाला विक्री

Next

माणिक डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पोटासाठी काहीतरी उद्योग करण्याची धडपड सुरू झाली आहे.

अनेक जणांनी रस्त्याकडेला भाजीची दुकाने थाटली आहेत. तर मलकापुरात अनेकांनी पानपट्टी बंद करून भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. या लॉकडाऊनचे समाजातील सर्वच घटकांवर मोठे परिणाम होत आहेत. बहुतांश उद्योगांवर विपरीत तर ठराविक व्यवसायावर चांगले परिणाम झाले. या सर्व परिणामांमुळे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधनच हरवले. परिणामी जगण्यासाठी नव्या व्यवसायाच्या वाटा शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. अनेकांनी जुने धंदे बंद करून कोरोना काळात चालणारे नवे व्यवसाय सुरू केले आहेत. अशाच पध्दतीने आगाशिवनगर झोपडपट्टीतील अबालवृध्दांसह तरुण असे शेकडो जण भाजीमंडईच्या व्यवसायाकडे वळले आहेत. अचानक सुरू केलेला भाजीमंडईचा व्यवसायच आज उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे.

या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या नागरिकांबरोबरच अनेक छोट्या व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बदलले आहेत. काही पानपट्टीधारकांनी पानपट्टीच्या मालाऐवजी भाजीपाला व जीवनावश्यक खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. असे अनेक दुकानदार जीवनावश्यक वस्तू विक्रीकडे वळल्याचे दिसत आहेत. त्यामुळे शहरात भाजीविक्रेते व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे.

चौकट :

जखीणवाडी रस्त्यांवर पुन्हा भाजीविक्रेत्यांची गर्दी...

मलकापुरात सुसज्ज भाजी मंडई सुरू झाल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी सवता सुभा मांडत कोयना वसाहत येथे जखीणवाडी रस्त्यावरच मंडई थाटली. या ठिकाणी दिवसेंदिवस नवनवीन भाजीविक्रेत्यांची भर पडत असल्यामुळे गर्दी होत आहे. ही गर्दीच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे.

चौकट :

उदरनिर्वाहासाठी अनेक जण दररोज सकाळी शिवछावा चौकातील उड्डाणपुलाखाली जाऊन थांबायचे. थोड्याच वेळात अनेक व्यवसायांचे ठेकेदार देतील ते काम करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही अनेक कामगारांची नित्याचीच बाब होती. मात्र, या लॉकडाऊनमुळे कामे बंद झाली. पर्यायाने उदरनिर्वाहासाठी अनेकांना भाजीविक्रीचा व्यवसाय निवडावा लागला आहे.

कोट :

सध्या कोरोनाच्या काळात पानपट्टीच्या व्यवसायाला बंदी आहे. जागा स्वतःची आहे. उत्पन्नाचे साधनच बंद झाले. घरात बसून संसाराचा गाडा कसा चालवायचा? त्यामुळे पानपट्टीच्या मलाऐवजी भाजीपाला व बेकरीच्या जीवनावश्यक वस्तूंचा माल भरल्यामुळे चार पैसे मिळतात.

- सुरेश पवार, पानपट्टीचालक, आगाशिवनगर

................................................................................................................................

Web Title: The sale of vegetables started by closing the leaf strip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.