विक्रीकर झाले वस्तू व सेवा कर भवन!
By admin | Published: July 1, 2017 05:02 PM2017-07-01T17:02:59+5:302017-07-01T17:02:59+5:30
झाले बारसे : जीएसटीमध्ये १३ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0१ : बहुचर्चित वस्तू व सेवा कर (जीएसटी) साताऱ्यासह संपूर्ण देशात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाला. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर शनिवारी साताऱ्यातील विक्रीकर भवनचे वस्तू व सेवा कर भवन असे नामकरण करण्यात आले. शनिवारी हा सोहळा पार पडला.
विक्रीकर भवनात जागोजागी वस्तू व सेवा कर चे फलक लागले होते. विक्रीकर भवनाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये सुबक रांगोळी रेखाटण्यात आली होती. विक्रीकर उपायुक्त सी. एम. टोपे यांच्या हस्ते कर सल्लागार, व्यापारी प्रतिनिधी तसेच विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वस्तू सेवा कर भवन या नामफलकाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर व्यापारी, करसल्लागार यांची बैठक घेण्यात आली. टोपे यांनी यावेळी सखोल मार्गदर्शन केले.
टोपे म्हणाले, जीएसटीमुळे निश्चितपणे कर वसुलीचे प्रमाण वाढणार आहे. जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांची नोंदणी सुरु आहे. तत्काळ नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्यांना वॉलंटरी नंबर दिला जात आहे. २0 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणीही करण्यात येणार आहे.
२0 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जवळपास १३ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी विक्रीकर विभागाकडे आधीच झाली आहे. राज्य शासन व केंद्र शासन वेगवेगळे कर आकारत होते. आता व्हॅट, सेल्स टॅक्स, लक्झिरियस टॅक्स, पर्चेस टॅक्स, लिज कायदा, प्रवेश कर, करमणूक कर असे अनेक कर रद्द होऊन आता केवळ जीएसटी कर आणण्यात आला आहे.
दरम्यान, जीएसटीच्या अनुषंगाने सातारा, वाई, कऱ्हाड, फलटण आदी तालुक्यांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना त्याबाबत कार्यशाळा घेतल्याचेही टोपे यांनी सांगितले.
रोज एक तास बैठक
रोजच्या कार्यालयीन कामकाजातील दुपारी ४ ते ५ यावेळेत व्यापारी, करसल्लागार व कार्यालयातील अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी अधिकारी दक्ष असल्याचे टोपे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
व्यापारी व कर सल्लागारांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांची नोंदणी नव्याने सुरु आहे. आमच्या कार्यालयाने वेगळा हेल्प डेस्क तयार केला आहे. कोणतीही तांत्रिक अडचण आली तर हा विभाग व्यापाऱ्यांना मदत करेल.
- बी. एन. टोपे,
विक्रीकर उपायुक्त