सलमानच्या पोस्टरला फासले काळे
By admin | Published: July 26, 2015 09:50 PM2015-07-26T21:50:30+5:302015-07-27T00:17:27+5:30
याकूबची पाठराखण अंगलट : राजलक्ष्मी सिनेमागृहाबाहेर संतप्त शिवसैनिकांची निदर्शने
सातारा : मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधातील टिष्ट्वट अभिनेता सलमान खानला चांगलेच भोवले. साताऱ्यातील शिवसैनिकांनी येथील राजलक्ष्मी सिनेमागृहासमोर सुरू असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या पोस्टरला काळे फासून सलमान खानचा निषेध केला. या प्रकारामुळे सिनेमागृहासमोर काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते.आरोपी याकूब मेमनला येत्या ३० जुलैला फासी देण्यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असताना अभिनेता सलमान खान याने रविवारी टिष्ट्वट करून याकूब मेमनच्या शिक्षेच्या संदर्भात आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. याबाबतचे वृत्त रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होऊ लागल्यानंतर त्याचे साताऱ्यातही पडसाद उमटू लागले. संतप्त शिवसैनिकांनी दुपारी साडेअकराच्या सुमारास थेट राजलक्ष्मी सिमेनागृहावर मोर्चा काढला. हातात सेनेचे झेंडे घेऊन कार्यकर्ते चित्रपटगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेले. दुपारी बारा वाजता ‘बजरंगी भाईजान’चा शो असल्याने प्रेक्षकांनी सिनेमागृहासमोर प्रचंड गर्दी केली होती. शिवसैनिकांना पाहून प्रेक्षकांमध्येही खळबळ उडाली. ‘सलमान खानचा निषेध असो..’ अशा घोषणा देत शिवसैनिक सिनेमागृहाच्या दर्शनी भिंतीवर चढले. ‘याकूबची बाजू घेणाऱ्या सलमानचा खानचा निषेध असो... सलमान खान.. हाय हाय,’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सलमान खानच्या पोस्टरला काळे फासले. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे संपूर्ण पोस्टर काळे करण्यात आले. भिंतीवरून खाली उतरल्यानंतर सिनेमागृहाच्या बाहेरच्या प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्ते आले. येथे कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन सलमान खानच्या निषेधाच्या घोषणा देत जोरदार निदर्शने केली. सुमारे पंचवीस मिनिटे हे आंदोलन सुरू होते.
दरम्यान, शिवसैनिकांची राजलक्ष्मी सिनेमागृहासमोर निदर्शने सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी रस्त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या बघ्यांना हटकले. त्यामुळे काहीवेळानंतर गर्दी कमी झाली. सलमान खानने माफी मागितली नाही, तर यापुढे त्याचे कोणतेही चित्रपट साताऱ्यात प्रर्दशित होऊ देणार नाही, अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी घेतली. (प्रतिनिधी)
अन् सलमानचा फॅनही संतापला !
सलमान खानने बॉम्ब स्फोटातील आरोपीची बाजू घेतल्याचे वक्तव्य केल्याचे समजताच त्याचा चित्रपट पाहाण्यास आलेल्या एका फॅननेही संताप व्यक्त केला. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचे काढलेले तिकीट त्याने फाडून टाकले आणि ‘सलमानचा चित्रपट पाहणार नाही,’असे मोठ मोठ्याने ओरडत त्याने सलमान खानचा निषेध केला.