उत्तर प्रदेशातील कलावंतांवरच तमाशा टिकून - : मंगला बनसोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:23 AM2019-05-17T00:23:20+5:302019-05-17T00:24:01+5:30
‘महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्धी असा लौकिक असलेल्या तमाशा या रांगड्या कलाविष्काराला पूरक ठरतील, अशा विविध कामांमध्ये चक्क उत्तर प्रदेशातील मुलांनी आघाडी घेतली आहे. इथे ऊसतोडणीला कामगार मिळेनात, मग तमाशाच्या कामाला कोठून मिळणार
पुसेगाव : ‘महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्धी असा लौकिक असलेल्या तमाशा या रांगड्या कलाविष्काराला पूरक ठरतील, अशा विविध कामांमध्ये चक्क उत्तर प्रदेशातील मुलांनी आघाडी घेतली आहे. इथे ऊसतोडणीला कामगार मिळेनात, मग तमाशाच्या कामाला कोठून मिळणार. आपली मुले ही कामे करण्यास तयार होत नसल्यामुळे फडामध्ये नाईलाजास्तव या मुलांना सामावून घ्यावे लागते,’ अशा शब्दात राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ तमाशा कलाकार मंगला बनसोडे यांनी मराठी मुलांच्या मानसिकतेवर सवाल टाकला.
सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू आहे. काही तांत्रिक कारणास्तव यात्रेतील बाज असलेला तमाशा नामशेष होण्याच्या मार्गावर आला आहे. खटाव तालुक्यातील एका यात्रेत तमाशाच्या निमित्ताने आलेल्या मंगला बनसोडे यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. आजोबा भाऊ मांग नारायणगावकर आई विठाबाई आणि आता मी अशा तीन पिढ्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. तमाशाच्या फडात कलाविष्कार सादर करणाऱ्या कलाकारासह दीडशे जणांचा समावेश असतो. राहुट्या किंवा तंबूची उभारणी खेळाचे साहित्य गाडीत भरणे आणि ज्या ठिकाणी खेळ असेल तेथे ते उतरवून घेणे यासह अनेक छोटी-मोठी कामे करण्यासाठी ताफा असतो. यापूर्वी ही कामे मराठी मुले करायची. आता त्यांना यामध्ये कमीपणा वाटू लागला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातून आलेली मुले या कामासाठी उपयोगी पडतात. त्यांना महिन्याला पगार दिला जातो. हंगाम नसतो तेव्हा दोन महिने ही मुले आपल्या गावी जातात, असे मंगला बनसोडे पांनी सांगितले.
कलेची सेवा करण्यासाठी आणि तमाशा कलावंत जगविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आम्ही कला सादर करीत आहोत. तमाशाच्या नावाखाली नाट्यग्रहांमध्ये संगीतबारीद्वारे लावण्याचे कार्यक्रम करणाºया कलाकारांना परदेशवारी घडत आहे. तमाशा कला मात्र आहे त्या ठिकाणीच राहिली, अशी खंत बनसोडे यांनी व्यक्त केली. गावातील प्रत्येक पक्षाचा नेता दादागिरी करून फुकटचे प्रेक्षक घुसवितो. त्यांना प्रवेश दिला नाही तर कनातच फाडून टाकली जाते. आमच्यावर हा अन्याय का? असा त्यांनी सवाल केला. सावकारी कर्ज काढून तमाशा कला टिकविण्याला प्रयत्न करत आहे. मग दीडशे लोकांच्या पोटावर पाय का ठेवला जातो, पैसे मोजल्याशिवाय पोलीस संरक्षण मिळत नाही. मात्र, बंदोबस्तासाठी आलेले दोन पोलीस कर्मचारी दांडगाई करणाºयावर कारवाई करत नाहीत. तुम्ही तमाशा करून निघून जाताल; पण आम्हाला गावातच राहायचं आहे, असे पोलीस सांगतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही कला जतन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शासनाच्या दुर्लक्षामुळे उपासमारीची वेळ...
गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ कलाकार मानधनापासून वंचित आहेत. सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे या वयोवृद्ध आणि आजारी कलांकारावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक गावांमध्ये खरे कलाकार मानधन मिळण्याच्या यादीमध्ये नाहीत. काही ठिकाणी तर बोगस कलाकार देखील समाविष्ठ झाले आहेत. त्यामुळे दुर्लक्षित कलाकारांवर अन्याय होत आहे, असे मंगला बनसोडे यांनी व्यक्त केले.