समर्थ एकांकिका स्पर्धा १७ फेब्रुवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 02:57 PM2020-01-02T14:57:46+5:302020-01-02T14:59:47+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली.
सातारा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली.
साताऱ्याच्या रंगकर्मींनी एकत्र येऊन स्पर्धेच्या माध्यमातून उभी केलेली ही चळवळ सतराव्या वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षी किमान ५० ते ६० संघ प्रयोग करण्याची इच्छा प्रदर्शित करतात; मात्र वेळेअभावी ३० ते २५ संघांनाच सहभाग देता येतो, हा अनुभव लक्षात घेता स्पर्धकांनी शक्य तितक्या लवकर प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन कार्यवाह राजेश मोरे यांनी केले आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघास मानाचा ह्यसमर्थ करंडकह्ण आणि रोख रक्कम व प्रमाणपत्र, द्वितीय संघास रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास रोख रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहे. याखेरीज उत्तेजनार्थ एकांकिका, शिस्तबद्ध संघ, नवीन संहितेसाठी, सर्वोत्तम स्थानिक संघास अशी रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पुरुष आणि स्त्री अभिनय, दिग्दर्शन या विभागांत रोख पारितोषिके देण्यात येतील तर नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंगभूषा व वेशभूषा या विभागातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख रुपयांची पारितोषिके देण्यात येतील, असे खजिनदार शेखर कुलकर्णी यांनी सांगितले.
स्पर्धकांना अवांतर प्रकाशयोजना, रंगभूषाकार अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धकांनी एकांकिकेच्या तीन प्रती, लेखकाचे संमतीपत्र, डीआरएम क्रमांक, प्रकाशयोजना आराखडा या बाबींची पूर्तता करून प्रवेश निश्चित करावा.
प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम प्रभुणे यांनी सांगितले. प्रेक्षकांना स्पर्धा पाहण्यासाठी नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धकांना आठ लेव्हल, चार मोडे, दोन स्पॉट, एक डीमर हे साहित्य संयोजकांकडून नि:शुल्क मिळणार आहे, असे मनोज जाधव यांनी सांगितले.