समर्थ मंदिर-सज्जनगड रस्ता : उद्धवसेनेचे आंदोलन; शेकडो वाहने थांबली; ठेकेदाराला पाठबळ कोणाचं ? 

By नितीन काळेल | Published: August 5, 2024 08:05 PM2024-08-05T20:05:21+5:302024-08-05T20:06:01+5:30

एक फूट खोल; तीन फूट रुंद खड्डे...

Samarth Mandir Sajjangarh Road Uddhavsena Movement Hundreds of vehicles stopped Who supports the contractor | समर्थ मंदिर-सज्जनगड रस्ता : उद्धवसेनेचे आंदोलन; शेकडो वाहने थांबली; ठेकेदाराला पाठबळ कोणाचं ? 

समर्थ मंदिर-सज्जनगड रस्ता : उद्धवसेनेचे आंदोलन; शेकडो वाहने थांबली; ठेकेदाराला पाठबळ कोणाचं ? 

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : सातारा शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली असून समर्थ मंदिर- सज्जनगड मार्गही खड्ड्यात गेलाय. या रस्त्यावर बोगद्यापर्यंत एक फुट खोल तर दोन-तीन फूट लांबीचे खड्डे पडलेत. यामुळे वाहने कशी चालवायची असा सवाल सातारकर करत आहेत. त्यातच याबाबत उध्दवसेनेने आंदोलन करुन वाचा फोडली. त्यामुळे मार्गावर शेकडो वाहने थांबली. तसेच यावेळी सेनेने संबंधित ठेकेदारावर कारवाईची आक्रमकपणे मागणी केली.

सातारा शहरातील समर्थ मंदिर येथून बोगदामार्गे सज्जनगड-ठोसेघर तसेच परळीला रस्ता जातो. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आतापर्यंत आरोप होत आला आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावर अक्षरक्षा चरी पडल्या आहेत. रस्त्याने वाहन घेऊन जाताना चालकांना आपला तोल जातो की काय असे होऊन जाते. तसेच समऱ्थ मंदिरपासून बोगद्यापर्यंतच्या अर्धा किलोमीटर अंतरात अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडले आहेत. तसेच वाहने जाऊन हे खड्डे दोन-तीन फूट लांबीचे झालेत. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहन नेताना कासवगतीने जावे लागते. तसेच काहीवेळा खड्डा चुकवायचा झाला तर अपघाताची भीतीही निर्माण झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबद्दल पहिल्यापासून शंका निर्माण करण्यात आलेली. तरीही संबंधित विभागाने झोपेचे सोंग घेतले. त्यामुळे याबाबत उध्दवसेनेने सोमवारी दुपारच्या सुमारास रास्ता रोको सुरू केला.

बोगद्याच्या प्रवेशद्वारासमोरच खुर्च्या टाकून सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते बसले. यामुळे दोन्ही बाजुंनी वाहने थांबली होती. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ हे आंदोलन चालले. त्यामुळे पोलिसांनाही घटनास्थळी धाव घ्यावी लागली. त्यानंतर सार्वजिनक बांधकाम विभागाचे अधिकारीही आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यावेळी आंदोलक आणि अधिकाऱ्यांत चर्चा झाली. समऱ्थ मंदिरपासून सज्जनगडच्या पायश्यापर्यंत रस्ता दुरुस्त करुण देण्यात येईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन माेहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सुनंदा महामुलकर, तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, सादिक शेख, रुपेश वंजारी, प्रणव सावंत, सचिन जगताप, रवि चिकणे, रवी भणगे, शिवराज टोणपे, सागर धोत्रे, इम्रान बागवान, अनिल गुजर, हरी पवार, अमोल गोसावी, आरिफ शेख, सनी बसवंत, राम साळुंखे, आनंद देशमुख, सुनील मोहिते, अजय सावंत, संदीप मोहिते, परवेझ शेख, आकाश पवार आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

....................
सातारा-सज्जनगड रस्ता दोन महिन्यांपूर्वी झाला आहे. तरीही या पावसात तो वाहून गेलाय. रस्त्याच्या निकृष्ट कामाला अधिकारी आणि संबंधित ठेकेदारच जबाबदार आहे. रस्ता खराब झाल्याने काहीजण जखमी झाले आहेत. याची कोणी जबाबदारी घेणार आहे की नाही. का माणसे मेल्यावर अधिकारी जागे होणार आहेत. याविरोधात आता सामान्य जनतेनेच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. तसेच याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करु.
- सचिन माहिते, जिल्हाप्रमुख उध्दवसेना

........................
पूर्ण रस्ता दुरुस्त; चाैकशी होणार...

आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी सज्जनगडपर्यंत रस्ता दुरुस्त करण्यात येईल. क्वाॅलिटी कंट्रोलर आणि संबंधित अभियंत्यांची चाैकशी करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, असे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले.
.................................................

आंदोलनानंतर साफसफाई...
हे आंदोलन झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्यावतीने रस्त्यावरील घाण काढण्यास सुरूवात झाली होती. बोगदा परिसरात वाहने आणि मजुरांच्या सहाय्याने काम करण्यात येत होते. पण, हे काम दाखविण्यापुरते असू नये, अशी अपेक्षा सातारकरांतून व्यक्त होत आहे.

.............................
रस्त्याचे ‘राज’ काय;

सातारा शहरातील अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. चार महिन्यांपूर्वी झालेले रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. खडी विस्कटली आहे. त्यामुळे वेगाने जाणारी वाहने घरुन अपघात घडत आहेत. त्यातच सातारा-सज्जनगड रस्त्याचा प्रश्न समोर आलेला आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे नक्की ‘राज’ काय ? त्यांना पाठबळ कोणाचं ? असा प्रश्न सातारकर विचारत आहेत.

Web Title: Samarth Mandir Sajjangarh Road Uddhavsena Movement Hundreds of vehicles stopped Who supports the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.