सांबरवाडी जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:40 AM2021-03-26T04:40:08+5:302021-03-26T04:40:08+5:30
सातारा : कास योजनेवरील आधारित असलेले सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त करण्यात आले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या केंद्राची स्वच्छता ...
सातारा : कास योजनेवरील आधारित असलेले सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्र गाळमुक्त करण्यात आले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या केंद्राची स्वच्छता करण्यात आली. या कामाची पाहणी करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाणीपुुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कासमधून येणारे पाणी सांबरवाडी येथील नऊ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध केले जाते. वर्षातून एकदा या फिल्टरेशन टँकची स्वच्छता करण्यात येते. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुधीर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सावंत व त्यांच्या पथकाने गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. ते काम गुरुवारी पूर्णत्वास आले. पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी फिल्टरेशन टँकची पाहणी केली.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कास जलाशयाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण केले जाईल. जलाशयातून पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर माती वाहत येऊन ती जलशुद्धिकरण केंद्रात साचली जाते. मातीचे रूपांतर गाळात होत असते. प्रतिवर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यात या केंद्राची स्वच्छता पालिकेच्या माध्यमातून केली जाते. नियमित कामाचा भाग म्हणून ही स्वच्छता करण्यात आली असून, सातारकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यास आपण नेहमीच कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी पाणीपुवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.
फोटो : २५ सांबरवाडी
सांबरवाडी येथील जलशुद्धिकरण केंद्रांची पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी पाहणी केली. यावेळी अभियंता सुधीर चव्हाण, संदीप सावंत, आदी उपस्थित होते.