Satara: येळगावच्या शेतकऱ्याने जमीन दिली महसूल खात्याला दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:20 IST2024-12-18T12:20:13+5:302024-12-18T12:20:35+5:30

संभाजी कारंडे यांनी शेतकऱ्यांपुढे ठेवला नवा आदर्श

Sambhaji Balkrishna Karande, a farmer from Yelgaon in Karhad taluka, donated land to the Revenue Administration for Talathi, Mandal Adhikari office | Satara: येळगावच्या शेतकऱ्याने जमीन दिली महसूल खात्याला दान

Satara: येळगावच्या शेतकऱ्याने जमीन दिली महसूल खात्याला दान

उंडाळे : कऱ्हाड तालुक्यातील येळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी संभाजी बाळकृष्ण कारंडे यांनी आपली रस्त्याकडेची सव्वादोन गुंठे जमीन महसूल प्रशासनाला दान दिली. गावातील तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयासाठी ही जमीन देण्यात आली आहे. यामुळे समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे.

ग्रामीण भागात शासकीय कार्यालये असतील तर गावकऱ्यांची धावपळ होत नाही; मात्र जागेअभावी योग्य ठिकाणी ती बांधता येत नाहीत. अशावेळी गावकऱ्यांचं हित पाहता सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांनी जमीन दान देऊन पुण्याचे काम करावे असा सहज शब्द कारंडे यांना महसूल सेवक रमेश वसंतराव पाटील यांनी टाकला. क्षणाचाही विलंब न लावता कारंडे यांनी होकार दिला. त्यानंतर महसूल सेवक संघटनेचे माजी अध्यक्ष विकास ठोंबरे यांना ही बाब दोघांनी सांगितली. ठोंबरे यांनी हा स्वागतार्ह निर्णय कऱ्हाडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांना कळविला.

तत्काळ संबंधित शेतकऱ्याला तहसीलदार कचेरीत बोलावून त्यांचा जाहीर सत्कारही घडवून आणला. या सत्काराला उत्तर म्हणून शेतकऱ्याने त्याच क्षणी संबंधित जमिनीचा रितसर दस्तावेज तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय येळगाव तर्फे तहसीलदार कऱ्हाड यांचे नावे करून दिला. एवढंच नव्हे तर या शेतकऱ्याने जमिनीच्या बदल्यात मिळणारी रक्कम सुद्धा नाकारली. यावेळी नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, प्रांत ऑफिसचे क्लार्क प्रवीण साळुंखे व येळगाव सर्कल मधील सर्व तलाठी उपस्थित होते.

अधिकारीही भारावून गेले

या शेतकऱ्याचा अल्प शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बकरी चारणे हा त्यांचा दुय्यम व्यवसाय आहे. त्यांना मुलगा नाही, मात्र इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलीलाच आपला मुलगा समजून ते तिच्यासाठी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. या शेतकऱ्याने आपला निर्णय तालुका प्रशासनाला कळविताच प्रशासकीय अधिकारीही अक्षरशः भारावून गेले. या दानशूर व्यक्तीचा इतरांनीही आदर्श घ्यावा अशा भावना यावेळी प्रांत अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Sambhaji Balkrishna Karande, a farmer from Yelgaon in Karhad taluka, donated land to the Revenue Administration for Talathi, Mandal Adhikari office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.