पाटणच्या वाहतूक पोलिसांची त-हाच न्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:45 AM2021-03-01T04:45:58+5:302021-03-01T04:45:58+5:30
गत चार-पाच वर्षांपूर्वी पाटणला जुनेजाणते पोलीस वाहतुकीची व्यवस्था सांभाळताना दिसत होते. त्यानंतर पोलिसांची संख्या कमी झाली. सध्या मात्र पाटणला ...
गत चार-पाच वर्षांपूर्वी पाटणला जुनेजाणते पोलीस वाहतुकीची व्यवस्था सांभाळताना दिसत होते. त्यानंतर पोलिसांची संख्या कमी झाली. सध्या मात्र पाटणला अगदी नव्याने भरती झालेले पोलीस कर्मचारी वाहतुकीची व्यवस्था सांभाळताना दिसत आहेत. त्यातच, होमगार्डही रस्त्यावर उभे असलेले दिसतात. इतर शहरांच्या तुलनेत पाटणला रहदारी आणि गर्दीची ठिकाणे कमी आहेत. त्यामुळे क-हाड-चिपळूण मार्गावरून येणारी वाहने वाहतूक पोलिसांचे ‘टार्गेट’ बनलेले असतात. तसेच सोमवारी आठवडाबाजार असला की, वडाप वाहतूक करणारी वाहने पोलिसांच्या रडारवर असतात. तसेच शहरातील जुने बसस्थानक परिसरात होत असलेली वाहनांची गर्दी यावरही वाहतूक पोलिसांना नियंत्रण ठेवावे लागते. मात्र, सध्या वाहतूक पोलीस रस्त्यावर उभे असताना संपूर्ण तोंड फडक्यात गुंडाळून किंवा मोठा हातरुमाल चेह-याला गुंडाळून उभे राहिलेले दिसतात. शहराबाहेर मणदुरेफाटा आणि रामापूरबाहेरचा परिसर येथे वाहने अडवून लायसन्स तसेच वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी ते करतात. यावेळी स्थानिक वाहनधारकांशी पोलीस वादावादी करीत नाहीत. मात्र, बाहेरून येणा-या वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याशी वाद घातला जात असल्याचे अनेकवेळा दिसून येते.
- चौकट
वडाप वाहनांची डायरी हातात
सोमवार असो किंवा तालुक्यातील इतर आठवडाबाजार असोत, वाहतूक पोलिसांची त्यादिवशीची तयारी काही वेगळीच असते. प्रत्येक वडाप वाहनास हात दाखवून अशी वाहने लांब पुढे उभी करण्यास सांगितले जाते. वाहन उभे करून चालक पाठीमागे चालत येतो आणि वाहतूक पोलिसाला गाडी नंबर सांगतो. संबंधित वाहतूक पोलीस जवळ असलेली डायरी बाहेर काढतो आणि त्यात त्या वाहनाचा नंबर असेल, तर अडवलेल्या वाहनाला मार्ग मोकळा होतो. नसेल तर पुन्हा भेट असे बजावले जाते. त्यामुळे डायरीत नक्की दडलंय काय, असा प्रश्न निर्माण होतो.
फोटो : २८केआरडी०१
कॅप्शन : पाटण येथे रस्त्यावर उभे असणारे वाहतूक पोलीस तोंडाला मास्क लावण्याऐवजी फडके गुंडाळून उभे असलेले दिसून येतात.