साऱ्याच पक्षांत इच्छुकांची मांदियाळी !
By Admin | Published: January 17, 2017 12:11 AM2017-01-17T00:11:55+5:302017-01-17T00:11:55+5:30
जोरदार तयारी : बंडखोरी रोखण्याचे राष्ट्रवादी, काँगे्रसपुढे मोठे आव्हान; उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची नेत्यांकडे धाव
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी वेगाने सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसोबतच भाजप, शिवसेना या केंद्र व राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षांनीही दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोरीला उधाण येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी वेगाने घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीने फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेनेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. भाजपने करहर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून अबाधित राहिलेला आहे. राज्यात व केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यत्वाच्या निवडणूक अर्जासाठी तुफान गर्दी झाली आहे. विविध आरक्षणनिहाय अर्ज घेण्यासाठी इच्छुक उमेदवार रांगा लावत आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे नेते चांगलेच सुखावले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील सर्वाधिकार विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे देण्यात आले असल्याने त्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थिती लावली होती. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, पक्षनिरीक्षक सुरेशराव घुले, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती इदाटे, अशोक गोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महिला आरक्षित जागेसाठी काही माता-भगिनी लहान चिमुकल्यांसह ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसत होते. कोरेगाव, जावली, सातारा, वाई, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, माण, खटाव, कऱ्हाड, पाटण याठिकाणी १ हजार ५८१ अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती देण्यात आली.
सभापतिपदांसाठी १९ रोजी आरक्षण सोडत
जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापतींसाठी गुरुवार, दि. १९ जानेवारी रोजी आरक्षण सोडत घेतली जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सातारा, वाई, कऱ्हाड, फलटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, माण, खटाव, पाटण, कोरेगाव पंचायत समितींच्या सभापतिपदी आरक्षण सोडत १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन भवनात होणार आहेत.
मतदार यादीवर आक्षेपासाठी आज अखेरची मुदत
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेली मतदार यादी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच गटविकास अधिकारी कार्यालयांमध्ये लावण्यात आली आहे. या यादीवर १७ जानेवारीपर्यंत हरकती नोंदविता येणार असून, मंगळवारी याची शेवटची मुदत आहे.