संपतंय सरण ; पण थांबेना मरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:26+5:302021-04-29T04:30:26+5:30
कऱ्हाड : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांना रुग्णालयात बेड मिळेना. उपचार सुरू असताना अनेकांचा जीव जातोय. तर उपचाराअभावी ...
कऱ्हाड : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांना रुग्णालयात बेड मिळेना. उपचार सुरू असताना अनेकांचा जीव जातोय. तर उपचाराअभावी काहीजण अखेरचा श्वास घेताहेत. रुग्णालयांमध्ये तर मृत्यूचं तांडव पहायला मिळतेय. अंत्यसंस्काराचं सरण संपतंय; पण स्मशानभूमीची धग थांबेना, अशी भयावह परिस्थिती आहे.
कऱ्हाडात नदीकाठी कोरोना स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. या स्मशानभूमीतील सध्याचे चित्र भयावह आणि तेवढेच विदारक आहे. गतवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या स्मशानभूमीत पहिल्या कोरोना मृतावर अंत्यसंस्कार झाले होते. मात्र, त्यानंतर आजअखेर येथील धग कमी झालेली नाही. गत वर्षभरात या स्मशानभूमीत तब्बल ६७८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सुरुवातीला पालिका कर्मचाऱ्यांमार्फत अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र, काही महिन्यांपासून पालिकेने कंत्राटी पद्धतीने हे काम सोपविले आहे.
गत वर्षभरात करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांपैकी सुमारे चारशे मृत कऱ्हाड तालुक्यातील होते. तर इतर तालुक्यांतून कऱ्हाडात उपचारासाठी आल्यानंतर येथेच मृत्यू झालेल्यांवरही पालिकेमार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बहुतांशवेळा बाधिताच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी त्यांचे नातेवाईक त्याठिकाणी उपस्थित असतात. मात्र, काहीवेळा कोणीही नातेवाईक उपस्थित नसताना अंत्यसंस्कार करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येते. त्यावेळी कर्मचारीही माणुसकी जपण्याबरोबरच मृतावर विधीवत अंत्यसंस्कार करतात. संबंधित कर्मचाऱ्यांचे धाडस, त्यांची सहनशीलता आणि ते जपत असलेली बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे.
- चौकट
साडेपाच हजारांची पावती
सुरुवातीला पालिका कर्मचारी अंत्यसंस्कार करीत असताना सर्व खर्च पालिकेमार्फत केला जात होता. मात्र, सध्या कऱ्हाड शहर वगळता ग्रामीणसह इतर भागातील कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रत्येकी साडेपाच हजार रुपयांची पावती केली जाते.
- चौकट
सहा जणांची टीम सज्ज
स्मशानभूमीत महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सध्या सहा जणांची टीम कार्यरत आहे. दिवसभर स्मशानभूमीत दाखल होणाऱ्या मृतदेहांवर या टीमकडून विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येतात. रात्री उशिराही एखादा मृतदेह आल्यास तातडीने पीपीई कीट परिधान करून ही टीम अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत दाखल होते.
- चौकट
पालिका कर्मचाऱ्यांकडून पाचशेवर अंत्यसंस्कार
कोरोना स्मशानभूमीत सुरुवातीला पालिका कर्मचाऱ्यांकडून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी पेठनिहाय रोटेशन पद्धतीने कर्मचारी काम करायचे. पालिका कर्मचाऱ्यांनी सुमारे पाचशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने हे काम देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराच्या माध्यमातून आणखी २२३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
- चौकट
दररोज ५ ते ६ टन लाकूड
कोरोना स्मशानभूमीत मृतदेह येतील त्याप्रमाणात लाकूड पुरविले जाते. सध्या दररोज ५ ते ६ टन लाकूड पुरविण्यात येत असून मृतदेह जास्त असतील तर लाकूडही जास्त प्रमाणात मागविण्यात येते.
- चौकट
७२३ : एकूण अंत्यसंस्कार
६७८ : दहनविधी
४५ : दफनविधी
८२ : कऱ्हाड शहर मृतदेह
२८२ : कऱ्हाड ग्रामीण मृतदेह
३५९ : कऱ्हाडबाहेरील मृतदेह
- चौकट
रुग्णालयनिहाय मृत्यू
कृष्णा : ९०
सह्याद्री : ६९
कॉटेज : ६८
सातारा : ७२
एरम : ४०
श्री : ६
कऱ्हाड हॉ. : ४
घरी : १६
- चौकट
आरोग्य केंद्रनिहाय मृत्यू
वडगाव हवेली : ३०
सदाशिवगड : २८
सुपने : १९
रेठरे : ३०
काले : ७०
इंदोली : २८
उंब्रज : २२
मसूर : ३०
येवती : ३०
कोळे : १७
हेळगाव : ६
कऱ्हाड : ५५
फोटो : २८केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडच्या कोरोना स्मशानभूमीत दररोज चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत असून येथील अग्निकुंडाची धग कमी होत नाही.