संपत जाधव यांचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:26+5:302021-04-18T04:39:26+5:30

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेतल्यानंतर संपत राजाराम जाधव यांचा मृत्यू झाला ...

Sampat Jadhav's death was not due to corona vaccine | संपत जाधव यांचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे नाही

संपत जाधव यांचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे नाही

googlenewsNext

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेतल्यानंतर संपत राजाराम जाधव यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर जाधव यांचा मृत्यू अन्य आजाराने झाला आहे, कोरोना लसीकरणामुळे नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि. १६ एप्रिलला रेठरे बुद्रुकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपत राजाराम जाधव (वय ५९) यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर, २० मिनिटांनी त्यांना डोकेदुखी होऊन चक्कर आली. कोरोना लसीकरणांतर्गत उद्भवणाऱ्या परिस्थितीत देण्यात येणारे औषोधपचार जाधव यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले, तसेच त्यांना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेने कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ समितीमार्फत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, संपत जाधव यांचा मृत्यू अन्य आजाराने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जाधव यांचा मृत्यू कोरोना लसीकरणाशी संबंधित नसल्याचे निर्दशनास आले आहे.

रेठरे बुद्रुकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ एप्रिल रोजी एकूण २२० लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. यामध्ये इतर लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. याबाबत आरोग्य विभागाकडील माता बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रमोद शिर्के यांनी भेट देऊन सर्व बाबींची पडताळणीही केली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत असणारी एईएफआय (लसीकरणानंतर उद्भवणारी गुंतागुंत समिती) ही संपत जाधव यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचे मूल्याकर करणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.

\\\\\\\\\\\\\\\\\\\

Web Title: Sampat Jadhav's death was not due to corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.