सातारा: पानवण फाटा येथे वाळूच्या डंपरने विद्यार्थ्यांना ठोकारले, तिघेजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:31 PM2022-08-08T16:31:28+5:302022-08-08T16:31:53+5:30
अपघाताची माहिती देऊनही पोलीस, महसूलचे अधिकारी लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
म्हसवड : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील पानवण फाटा येथे आज, सोमवारी सकाळी सातच्या सुमारास वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीवरून शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासाहेब चव्हाण, सुधीर शामराव शिंदे अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
जखमीमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे, अपघाताची माहिती देऊनही पोलीस, महसूलचे अधिकारी लवकर न आल्याने पानवण ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदारांच्या गाडीला ग्रामस्थांनी घेराव घातला.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पानवण येथील बारावीत शिकणारे समाधान राधाप्पा नरळे, शुभम दादासो चव्हाण, सुधीर शामराव शिंदे हे तिघे देवापूर येथील विद्यालयात शिकत आहेत. शाळेत जादा तास असल्याने ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरातून दुचाकीवरून देवापूरला निघाले. त्यांची दुचाकी गंगोती फाट्याजवळ आली असता समोरुन वाळूने भरलेल्या भरधाव डंपरने (एमएच ११ एएल ४८४५) ने विद्यार्थ्यांच्या दुचाकी (एमएच ४२ एन ५२०१) त्यांना जोरात धडक दिली.
या धडकेत तिन्ही मुले उडून बाजूला पडली. यामध्ये तीन ही विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी शुभम चव्हाण व सुधीर शिंदे यांना म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर समाधान नरळे यास पुढील उपचारार्थ प्रथम अकलूज येथे नेण्यात आले. मात्र, तेथे त्याची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्याला तेथून पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची चौकशी करून संबंधित डंपर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी सांगितले.